पार्थ सरचिटणीस, तर जय पवार राष्ट्रीय सचिव; निवडणूक आयोगाकडे सोपवली नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक संरचनेत मोठे फेरबदल करताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा दोन्ही सुपुत्रांकडे सोपवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा विस्तार करताना सुनेत्रा पवार यांनी आपले पुत्र पार्थ पवार यांची सरचिटणीसपदी, तर धाकटे पुत्र जय पवार यांची राष्ट्रीय सचिव आणि पक्ष शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भातील अधिकृत यादी निवडणूक आयोगाकडे २९ एप्रिल रोजी पाठवण्यात आली आहे.
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आता त्यांनी पक्षाच्या २२ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत आपल्या दोन्ही पुत्रांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार आता राष्ट्रीय पातळीवर पक्ष समन्वयाचे मुख्य काम पाहणार आहेत. दुसरीकडे, जय पवार यांच्याकडे सचिवपदासह पक्षांतर्गत शिस्त राखण्याची आणि कोषाध्यक्षपदाचीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलेल्या या नव्या कार्यकारिणीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावांचा समावेश असला, तरी त्यांच्या पदांपुढे अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभेतील गटनेते इतकाच उल्लेख करण्यात आला आहे. दिलीप वळसे-पाटील, सुबोध मोहिते, माणिकराव कोकाटे आणि शिवाजीराव गर्जे (कोषाध्यक्ष) यांची नावेही यादीत कायम आहेत.
https://prahaar.in/2026/05/12/neet-exam-has-been-cancelled-due-to-a-paper-leak-what-happens-next/
युवा चेहऱ्यांना संधी
पक्षाने प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणे साधण्यासाठी युवा चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. यामध्ये धीरज शर्मा यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार चेतन तुपे, शेखर निकम, सरोज अहिरे आणि सना मलिक यांनाही कार्यकारिणीत सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. याशिवाय, अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातुंग आणि इतर राष्ट्रीय सचिवांच्या नियुक्तीमुळे पक्षाने राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचे धोरण आखल्याचे दिसून येत आहे.