२२ लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत निराशाजनक आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या ३ मे रोजी देशभरात पार पडलेली बहुचर्चित ‘नीट’ (NEET UG) परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर अखेर रद्द करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयामुळे देशभरातील तब्बल २२ लाख आणि महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. वर्षभर रात्रंदिवस एक करून केलेला अभ्यास आणि आता नव्याने द्यावी लागणारी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या प्रचंड चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे.
परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधीच फुटला होता पेपर!
देशातील कोणत्याही नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ‘नीट’ (NEET UG 2026) ही प्रवेश परीक्षा सर्वात महत्त्वाची पायरी मानली जाते. पण, याच अत्यंत पारदर्शक मानल्या जाणाऱ्या परीक्षेवर आता मोठा डाग लागला आहे. राजस्थान पोलिसांच्या ‘स्पेशल ऑपरेशन ग्रुप’ने (SOG) या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्ष परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधीच संपूर्ण प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली होती. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत देशभरातून १३ संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून कसून चौकशी सुरू आहे.
टेलिग्रामवर ‘गेस पेपर’च्या नावाने झाला व्हायरल
पोलिसांच्या तपासातून या रॅकेटची धक्कादायक कार्यपद्धती उघडकीस आली आहे. ३ मे रोजी होणाऱ्या या परीक्षेचा पेपर १ मे रोजीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये पोहोचला होता. यासाठी समाजकंटकांनी अतिशय शिताफीने ‘टेलिग्राम’ ॲपचा वापर केला. कुणाला संशय येऊ नये म्हणून हा पेपर ‘गेस पेपर’ (संभाव्य प्रश्नपत्रिका) या नावाखाली विविध ग्रुप्सवर शेअर करण्यात आला. विशेषतः राजस्थानचे कोचिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सीकर’ शहरात या पेपरचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळाला. परीक्षेच्या दोन दिवस आधीच तेथील अनेक हॉस्टेल्स आणि पेईंग गेस्ट (PG) मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती हा हस्तलिखित पेपर लागला होता.
https://prahaar.in/2026/05/12/himanta-biswa-took-oath-as-chief-minister-of-assam-4-mlas-took-oath-as-ministers/
केरळ कनेक्शन आणि एका ‘एमबीबीएस’ विद्यार्थ्याचा मास्टरमाईंड प्लॅन
या पेपरफुटीचे धागेदोरे थेट दक्षिणेत केरळपर्यंत पोहोचले आहेत. केरळमधील एका अत्यंत प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका ‘एमबीबीएस’ (MBBS) विद्यार्थ्यानेच १ मे रोजी हा पेपर हस्तगत करून आपल्या राजस्थानातील मित्राला पाठवला होता. तेथून हा पेपर सीकरमधील एका पीजी चालकाच्या हाती लागला आणि त्याने तो तिथल्या करिअर काउन्सलर्स व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. पोलिसांच्या छाप्यात जप्त करण्यात आलेले ३०० हून अधिक प्रश्नांचे संच एकाच हस्ताक्षरात असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, मूळ पेपरमधून कोणीतरी जाणीवपूर्वक हे प्रश्न एका कागदावर उतरवून काढले होते. हा कोणताही योगायोग नसून, एका संघटित टोळीने रचलेला हा एक अत्यंत सुनियोजित कट होता.
७२० पैकी तब्बल ६०० गुणांचा पेपर जसाच्या तसा!
या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी होती, याचा अंदाज यावरून येतो की, ‘नीट’मधील एकूण १८० प्रश्नांपैकी तब्बल १५० प्रश्न या हस्तलिखित संचातून जसेच्या तसे विचारले गेले होते. याचा सरळ अर्थ असा की, ज्या विद्यार्थ्यांच्या हाती ही चिठ्ठी लागली, त्यांना ७२० पैकी सहज ६०० गुण मिळवणे सहज शक्य होते. या प्रचंड मोठ्या गैरव्यवहारामुळे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी, ३ मे रोजी झालेली NEET UG 2026 ची परीक्षा अखेर अधिकृतरीत्या रद्द घोषित करण्यात आली आहे. आता लवकरच या परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा केली जाईल. तसेच, या गुन्हेगारी रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआयने (CBI) तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.