Home महत्वाची बातमी माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अंगरक्षक श्याम सोनावणे बडतर्फ

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अंगरक्षक श्याम सोनावणे बडतर्फ

0
माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अंगरक्षक श्याम सोनावणे बडतर्फ

दीड वर्षांनंतर मुंबई पोलिसांची कारवाई; गोळीबारावेळी प्रतिकार न केल्याचा ठपका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. आता या प्रकरणाला दीड वर्ष उलटल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस हवालदार श्याम सोनावणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यावर असताना दाखवलेला निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर परिसरात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या वेळी श्याम सोनावणे हे सिद्दीकी यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्यासोबत होते. मात्र, हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा सोनावणे यांनी कोणताही प्रतिकार केला नाही किंवा परिस्थिती हाताळण्यात ते अपयशी ठरले, असा प्राथमिक ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या विभागीय चौकशीत सोनावणे दोषी आढळल्याने त्यांना बडतर्फीचा आदेश जारी करण्यात आला.

चौकशीदरम्यान सोनावणे यांनी आपला बचाव करताना सांगितले होते की, त्या दिवशी दसरा असल्याने परिसरात फटाक्यांची मोठी आतिशबाजी सुरू होती. मिरवणुकीच्या गोंगाटामुळे आणि धुरामुळे आपल्याला हल्लेखोरांना ओळखता आले नाही किंवा गोळीबाराचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला नाही. मात्र, पोलीस दलाने हे कारण अमान्य करत, सुरक्षेसारख्या संवेदनशील कर्तव्यावर असताना दाखवलेली ही कसुरी गंभीर मानली आहे.

https://prahaar.in/2026/05/11/committee-formed-to-study-incentive-policy-for-film-industry/

सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यासाठी ‘२+१’ अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र, हल्ल्याच्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास केवळ सोनावणे हे एकटेच त्यांच्यासोबत होते. दुसरा सुरक्षा रक्षक साडेआठ वाजताच ड्युटी संपवून निघून गेला होता. सिद्दीकी यांच्यासोबत कोणताही खासगी बाऊन्सर नव्हता, ही बाब हल्लेखोरांच्या पथ्यावर पडली.

https://prahaar.in/2026/05/11/chief-minister-devendra-fadnavis-has-claimed-that-prime-minister-narendra-modis-appeal-is-right/

२७ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक

गँगस्टर अनमोल बिश्नोई याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत २७ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोनावणे यांच्या बडतर्फीमुळे पोलीस दलातील शिस्त आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here