मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय विनोदवीर भाऊ कदम हे प्रेक्षकांचे कायमच आवडते कलाकार राहिले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘फू बाई फू’सारख्या कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या अभिनयाइतकंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम ही देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचे व्हिडिओ, व्लॉग आणि पोस्ट्स नेहमी चर्चेत असतात. भाऊ कदम यांच्याप्रमाणेच मृण्मयीला देखील प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळतं.
https://prahaar.in/2026/05/08/nida-khan-is-sheltered-by-imtiaz-jalil-minister-sanjay-shirsat-attacks-imtiaz-jalil/
काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने परदेशातून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण घेत असताना आत्मनिर्भर होण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे परदेशात शिक्षण घेत असतानाच ती कॅफेमध्ये काम करत होती. अभ्यास आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी सांभाळत तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचे फोटो Instagram वर शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये ती आई-वडिलांसोबत दिसत होती. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया देत ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.
या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी मृण्मयीने स्वतः एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, “मी Instagram वर माझी पोस्ट पाहिली आणि त्यानंतर त्या पोस्टखालील कमेंट्स वाचल्या. मुली बाहेर जाऊन शिकत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, ग्रॅज्युएट होत आहेत, पुढे जात आहेत… त्यामुळे काही लोकांचा मेल इगो हर्ट होतो.”
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/05/08/suryakumar-yadav-will-be-relieved-of-his-captaincy-who-will-become-indias-new-captain-important-update-from-bcci/
यानंतर तिने काही ट्रोलिंग कमेंट्स वाचून दाखवल्या. एका यूजरने कमेंट केली होती, “पैसा असेल तर कुठेही उच्च शिक्षण घेता येतं.” यावर उत्तर देताना मृण्मयी म्हणाली, “हो, पैसा महत्त्वाचा असतोच. पण मेहनत नावाची गोष्टही असते. देवाने आपल्याला हातपाय दिले आहेत, मग कायम आई-वडिलांच्या पैशांवरच अवलंबून का राहायचं? स्वतः मेहनत करून काहीतरी मिळवण्यात वेगळीच समाधानाची भावना असते.”
दरम्यान, एका ट्रोलरने कमेंट केली होती, “बाप एवढा कमवतोय तर लेकीला कॅफेमध्ये काम करण्याची काय गरज?” यावर मृण्मयीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली, “मला आत्मनिर्भर व्हायचं होतं. स्वतः कमावण्याची आणि स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याची मला हौस होती. त्यामुळे मी काम केलं आणि त्याचा मला अभिमान आहे.”
मृण्मयी कदमच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे. अनेकांनी तिच्या आत्मनिर्भर विचारांचं कौतुक करत अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिला आहे.