Home महाराष्ट्र नाशिक Ashok Kharat : अशोक खरातने पाच वर्ष लुटल्याचा पुण्यातल्या बिल्डरचा आरोप

Ashok Kharat : अशोक खरातने पाच वर्ष लुटल्याचा पुण्यातल्या बिल्डरचा आरोप

0
Ashok Kharat : अशोक खरातने पाच वर्ष लुटल्याचा पुण्यातल्या बिल्डरचा आरोप
Ashok Kharat

पुणे : भोंदू अशोक खरातने तब्बल पाच वर्ष लुबाडले. कोट्यवधी रुपये उकळले. एक आलिशान मर्सिडीज कार पण जबरदस्तीने बळकावली असा गंभीर आरोप पुण्यातील एका बिल्डरने (खासगी विकासक) केला आहे. या आरोपांमुळे अशोक खरातचे नवे उद्योग उघडकीस आले आहेत.

आरोप करणारा बिल्डर आधी अशोक खरातच्या प्रभावात होता. त्याने अशोक खरातला एक मर्सिडिज कार भेट म्हणून दिली होती. पण अशोक खरातने ही कार दबाव टाकून स्वतःच्या नावावर करून घेतली, असा आरोप आता संबंधित बिल्डरने केला आहे. मागील काही वर्षात वेगवेगळी कारणे देऊन अशोक खरातने तब्बल चार ते पाच कोटींचा गंडा घातला, असाही आरोप पुण्याच्या बिल्डरने केला आहे.

पुण्याच्या बिल्डरच्या आरोपांतील सत्यतेचा तपास एसआयटी करत आहे. अशोक खरात आणि बिल्डर यांच्यातील आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी सुरू आहे. सध्या पोलिसांनी न्यायालयासमोर अशोक खरात खंडणी घेत असल्याचा प्राथमिक दावा केला आहे.

अशोक खरातने बिल्डरसोबत मागील पाच वर्षात विविध देशांचे दौरे केले आहेत. व्यावसायिक भरभराट होईल असे सांगत अशोक खरातने या दौऱ्यांदरम्यान काही ठिकाणी तंत्रमंत्र, जादूटोण्याचे प्रयोग करून बिल्डरकडून मोठी रक्कम घेतली होती. सलग पाच वर्षे हा प्रकार सुरू असूनही बिल्डरला फसवणूक होत असल्याची जाणीव का झाली नाही याचेच आश्चर्य तपास पथकाला वाटत आहे ? यामुळे बिल्डरच्या आरोपांचा तपास करतानाच त्याच्या आरोपांतील तथ्याचीही कसून पडताळणी सुरू आहे.

अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सोमवार ४ मे २०२६ रोजी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. तपास पथक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी सोमवारी होणाऱ्या सुनावणीवेळी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.