आज १ मे २०२६ रोजी अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखचा बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असलेल्या या चित्रपटात स्वतः रितेशने महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या सरप्राईज एण्ट्रीची! सलमान खानने या चित्रपटात ‘जिवा महाला’ यांची भूमिका साकारली असून, पडद्यावर त्याची एण्ट्री होताच प्रेक्षक टाळ्या आणि शिट्ट्यांनी संपूर्ण थिएटर दणाणून सोडत आहेत. सध्या त्याच्या या कॅमिओचा एक सीन सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या मेगाबजेट चित्रपटात जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर यांसारख्या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
https://prahaar.in/2026/05/01/dharashiv-there-was-a-commotion-at-the-maharashtra-day-program-a-woman-poured-petrol-on-herself-and/
हातात तलवार आणि भगवा फेटा… सलमानच्या ‘जिवा महाला’ लूकची चर्चा
गेल्या अनेक महिन्यांपासून गुलदस्त्यात असलेल्या सलमान खानच्या ‘राजा शिवाजी’मधील भूमिकेवर आता अखेर पडदा उठला आहे. खुद्द रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ६’ च्या ग्रँड फिनालेमध्ये या खास भूमिकेची घोषणा केली होती. आता प्रत्यक्ष चित्रपटगृहात सलमानची धमाकेदार एण्ट्री पाहून चाहते अक्षरशः वेडेपिसे झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या या एन्ट्रीच्या व्हायरल व्हिडीओला प्रेक्षकांकडून उदंड पसंती (लाइक्स आणि कमेंट्स) मिळत आहे. या दृश्यामध्ये सलमानचा भगवा फेटा, कुर्ता आणि हातात भवानी तलवार असा रुबाबदार लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः, शत्रूच्या मानेवर थेट तलवार रोखून जेव्हा सलमान “शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं..” असा दमदार डायलॉग मारतो, तेव्हा संपूर्ण थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांचा अक्षरशः भूकंप पाहायला मिळत आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटातील सलमान खानच्या दमदार एन्ट्रीची सध्या सर्वत्र चर्चा आहे, मात्र यामागील पडद्यामागचा किस्सा खूपच रंजक आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खुद्द रितेश देशमुखने याचा खुलासा केला आहे. रितेशने सांगितले की, मुळात या चित्रपटात सलमानसाठी कोणतीही भूमिका ठरलेली नव्हती आणि त्याने भाईजानशी संपर्कही साधला नव्हता. मात्र, नवीन वर्षाच्या निमित्ताने जेव्हा या दोघांची भेट झाली, तेव्हा सलमानने स्वतःहून शूटिंग कधी सुरू होत आहे आणि त्यात आपली भूमिका काय आहे, अशी विचारणा केली. रितेशने त्याला चित्रपटात कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट करताच सलमानने चक्क हट्टच धरला. “माझ्याशिवाय तू हा चित्रपट बनवूच शकत नाहीस, मला यात असायलाच हवे,” असा प्रेमाचा आग्रह त्याने रितेशकडे केला. सलमानच्या याच हट्टाखातर अखेर त्याच्यासाठी या चित्रपटात एका खास भूमिकेचा विचार करण्यात आला आणि अशा प्रकारे भाईजान या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचा हिस्सा बनला.