बंगळुरु : आयपीएल २०२६ हंगामात गतविजेते म्हणून खेळणाऱ्या आरसीबीने आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. साई सुदर्शनने घरच्या मैदानावर शतक झळकावले, पण या शतकाचाही त्याच्या संघ, गुजरात टायटन्सला फायदा झाला नाही. साईने ५८ चेंडूंमध्ये १०० धावा करून गुजरातला आरसीबीसमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवण्यास मदत केली. तर, आरसीबीसाठी विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. शून्यावर असताना जीवदान मिळाल्यानंतर, त्याने ४४ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि चार षटकारांसह ८१ धावा केल्या. यामुळे आरसीबीने १८.५ षटकांत पाच विकेट्स गमावून २०६ धावा केल्या आणि सात सामन्यांतील आपला पाचवा विजय नोंदवला.
https://prahaar.in/2026/04/17/ipl-2026-mi-vs-pbks-some-tough-decisions-have-to-be-made-hardik-pandya-will-mumbais-internal-dispute-affect-the-game/
बंगळूरूमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाकडून, सलामीवीर साई सुदर्शनने एक बाजू सांभाळली, तर शुभमन गिलने २४ चेंडूंमध्ये ३२ धावा करून १२.४ षटकांत १२८ धावांची मजबूत सलामीची भागीदारी रचली. गिलच्या पाठोपाठ, जोस बटलरने दोन चौकार आणि एका षटकारासह १६ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. साई सुदर्शनने ११ चौकार आणि पाच षटकारांसह ५८ चेंडूंमध्ये १०० धावा ठोकल्या, जे या हंगामातील त्याचे पहिले आणि आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक होते. प्रथम फलंदाजी करताना, गुजरातने तीन विकेट्स गमावून २०५ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवुड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली. गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या जेसन होल्डरने एक चौकार आणि दोन षटकारांसह १० चेंडूंमध्ये २३ धावांची नाबाद खेळी केली.
https://prahaar.in/2026/04/16/mumbai-indians-suffer-fourth-consecutive-defeat-punjab-wins-kings-become-ipl-toppers/
२०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, आयपीएलमध्ये आरसीबीकडून पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून खेळणारा जेकब बेथेल १० चेंडूंमध्ये १४ धावा करून बाद झाला. पण, विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावा जोडून गुजरातला विजय मिळवून दिला. देवदत्तने दोन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने २७ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या, तर कोहलीने आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूंमध्ये ८१ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर टीम डेव्हिड एका षटकाराच्या मदतीने ८ चेंडूंमध्ये ९ धावांवर नाबाद राहिला, तर कृणाल पांड्याने १० चेंडूंमध्ये १८ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीने १८.५ षटकांत ५ विकेट्स गमावून २०६ धावा केल्या आणि पाच विकेट्स राखून सहज विजय नोंदवला. गुजरातकडून रशीद खानने दोन विकेट्स घेतल्या.