Home ब्रेकिंग न्यूज Bawankule : काँग्रेसने विरोध करून एससी, एसटी, ओबीसी महिलांचे नेतृत्व झिडकारले !

Bawankule : काँग्रेसने विरोध करून एससी, एसटी, ओबीसी महिलांचे नेतृत्व झिडकारले !

0
Bawankule : काँग्रेसने विरोध करून एससी, एसटी, ओबीसी महिलांचे नेतृत्व झिडकारले !
Chandrashekhar Bawankule

नागपूर : नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध करून मतदारसंघांच्या फेररचनेत निर्माण होणारे एससी, एसटी आणि ओबीसी महिलांचे राजकीय प्रतिनिधीत्व झिडकारले आहे. महिलांच्या राजकीय ताकद वाढविण्याच्या ऐतिहासिक प्रगतीला काँग्रेसने खीळ घातली आहे. महिला काँग्रेसला धडा शिकवतील, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पासाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी या नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या विरोधात मतदान करून आपल्या महिला विरोधी धोरणाचे दर्शन घडवले. ज्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केले, त्यांना देशातील आणि राज्यातील महिला आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.”

पालकमंत्री असल्याने अमरावतीच्या परतवाडा येथील अश्लील व्हिडिओ प्रकरणात सुरू असलेल्या तपासाचा आणि कायदेशीर कारवाईचा मी स्वतः रोज आढावा घेत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने फॉरेन्सिक आणि डिजिटल प्रणालीचा (अॅडव्हान्स सिस्टीम) वापर करून तपास केला जात आहे. सात मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांच्या ऑडिटचा अहवाल येणे बाकी आहे. मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत. जोपर्यंत अंतिम पोलीस अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणीही राजकीय चर्चा किंवा वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, जेणेकरून तपासावर दबाव येणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पाऊस आणि पाणी टंचाईबाबत सरकार सतर्क

सरकार सतर्क असून, प्रशासनाला ५० टक्के पाणी कपातीचे नियोजन आणि सूचना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे सर्वांनी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे, असे बावनकुळे म्हणाले. त्यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.