मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ ( Bigg Boss Marathi Season 6) आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जसजसा ग्रँड फिनाले जवळ येत आहे, तसतसा घरातील खेळाला वेग आला असून स्पर्धकांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. गेल्या काही दिवसांत अनपेक्षित एलिमिनेशनमुळे प्रेक्षक आणि घरातील सदस्य दोन्ही हादरले असतानाच, आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या ‘भाऊचा धक्का’ या भागाकडे लागल्या आहेत. गेल्या संपूर्ण आठवड्यात घरामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः नॉमिनेशन टास्क दरम्यान राकेश आणि विशाल यांच्यात झालेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. हा वाद केवळ खेळापुरता मर्यादित न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचला, ज्याचे रूपांतर एका मोठ्या खडाजंगीमध्ये झाले. दोघांमधील हाणामारीची परिस्थिती पाहून घरातील इतर सदस्यही चिंतेत पडले होते. या राड्यामुळे बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन झाले असून, आज रितेश देशमुख या प्रकरणावर काय भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलर्स मराठीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख अत्यंत गंभीर अवतारात दिसत आहेत. यावरून असे स्पष्ट होत आहे की, आज राकेश आणि विशाल या दोघांचीही रितेश भाऊंकडून कडक शब्दांत खरडपट्टी काढली जाणार आहे.
https://prahaar.in/2026/04/04/stalled-redevelopment-projects-in-juhu-dahisar-and-andheri-set-to-get-back-on-track/
नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची धाकधूक वाढली
‘डबल एलिमिनेशन’नंतर आता कोणाचा नंबर?
गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसला, जेव्हा प्रभू शेळके आणि वाईल्ड कार्डद्वारे घरात आलेला संकेत पाठक या दोघांनाही एकाच वेळी घराबाहेर पडावे लागले. या ‘डबल एलिमिनेशन’नंतर आता घरातील सदस्यांची संख्या केवळ आठवर येऊन ठेपली आहे. घराबाहेर पडल्यानंतर प्रभू शेळकेने तन्वी कोलते हीच या सीझनची विजेती व्हावी, अशी इच्छा व्यक्त करत घरातील समीकरणे अधिक रंजक केली आहेत. आता पुन्हा एकदा शनिवार-रविवार म्हणजेच ‘भाऊचा धक्का’ जवळ आला असून, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे – “आज घरचा रस्ता कोण धरणार?” या आठवड्यात घरात झालेले हाय-व्होल्टेज राडे आणि एकमेकांवर झालेली वैयक्तिक चिखलफेक पाहता, रितेश देशमुख कोणाची कडक शब्दांत शाळा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.