नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शब्दांचे बोचरे वार केले आहेत. “ज्यांना स्वतःचा पक्ष आणि घर नीट सांभाळता येत नाही, ते देश किंवा राज्य काय सांभाळणार?” असा जळजळीत सवाल त्यांनी नाव न घेता उपस्थित केला. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत वाघमारेंनी त्यांच्या नेतृत्वक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले. यावेळी त्यांनी शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या सुरात सूर मिसळत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत आजारपण असूनही दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची खिंड लढवत आहेत. मात्र, त्यांची सुद्धा कॉलर युवराज पकडत आहेत,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटातील अंतर्गत वादावर बोट ठेवले. नांदेडमधील या दौऱ्यात वाघमारेंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
“ज्या नेत्याला आपले घर, सख्खा भाऊ आणि स्वतःचा पक्ष एकसंध ठेवता आला नाही, ते देश किंवा राज्य सांभाळण्याच्या गप्पा कशा मारू शकतात?” असा थेट सवाल राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. खासदारपदी नियुक्ती झाल्यापासून आपण तळागाळातील लोकांशी संवाद साधत असून, ज्यांचा आवाज दाबला गेला आहे, अशा वंचितांची ताकद बनण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे गटातील अंतर्गत वादावर बोट ठेवताना वाघमारे म्हणाल्या की, “उद्धव ठाकरेंना त्यांचे चुलत भाऊ (राज ठाकरे) सोडून गेले, स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही. आज जी परिस्थिती आहे, त्यात संजय राऊत माध्यमांसमोर येऊन पक्षाची खिंड लढवत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही ‘युवराज’ (आदित्य ठाकरे) त्यांची कॉलर पकडत असल्याच्या बातम्या येत आहेत, तर दुसरीकडे प्रियंका चतुर्वेदीही संताप व्यक्त करत आहेत.” ठाकरे गटात सध्या मोठी यादवी माजली असून, हा पक्ष अंतर्गत संघर्षातूनच लयाला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.