Home साप्ताहिक अर्थविश्व मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर, ‘रेडिओ क्लब जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार’

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर, ‘रेडिओ क्लब जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार’

0
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर, ‘रेडिओ क्लब जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार’

मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून अव्वल कामगिरी करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून नवे अर्थबळ दिले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्याची ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ जाहीर करीत दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले. अशी योजना जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रतिवर्षी १ हजार २४० कोटी रुपये देण्यात येतील. राज्यातील २० हजार ५९४ मासेमारांना याचा लाभ होणार आहे. त्याशिवाय सध्याचे १२५ किमी जलमार्गांचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी विद्यमान २१ जलमार्गांवरील २० टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. ११ नवीन जलमार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स उभारले जातील. त्यासाठी ६ हजार ६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मरिन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार

राज्यात मरिन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर उभारण्यासह आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित केली जाईल. लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करणार आहोत. वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.