मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोप देताना ८९ धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्याच्या या खेळीने इंग्लंडच्या आत्मविश्वासाचा चुराडा केला. भारतीय फलंदाजांनीही संजूने रचलेल्या पायावर धावसंख्येचे मोठे इमले रचले. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सर्वात वेगवान शतकांमध्ये दुसरे स्थान पटकावले. संजूने आज विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आणि भारताने दोनशेपार धावांचा डोंगर उभा केला. वर्ल्ड कप नॉक आऊटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठऱली.
https://prahaar.in/2026/03/05/will-india-achieve-a-historic-feat/
अभिषेक शर्मा (९) पुन्हा अपयशी ठरला, पंरतु संजू इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नाही नमला. त्याने कोलकातामध्ये केलेल्या खेळीचा अॅक्शन रिप्ले मुंबईत दाखवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत ५०+ धावांची खेळी करणारा संजू भारताचा चौथा सलामीवीर ठरला. संजूला दुसऱ्या विकेटसाठी इशान किशनची साथ मिळाली आणि दोघांनी ४५ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. इशान १८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर झेलबाद झाला. भारतासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.
भारताने फलंदाजीच्या स्ट्रॅटेजीत बदल करताना शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. शिवमने इंग्लंडचा प्रमुख फिरकीपटू आदिल रशीदला एकाच षटकात दोन खणखणीत षटकार खेचून इशानच्या विकेटचा वचपा काढला. संजू आणि शिवम या जोडीने २२ चेंडूंत ४३ धावा जोडल्या. संजू ४२ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांवर झेलबाद झाला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. संजूने विराट कोहलीच्या ( नाबाद ८९ धावा वि. वेस्ट इंडिज, मुंबई, २०१६ उपांत्य फेरी) विक्रमाशी बरोबरी केली.
नॉकआऊट सामन्यात सर्वांधिक धावसंख्येच्या या विक्रमात फिन अॅलन ( नाबाद १०० वि. दक्षिण आफ्रिका, कोलकाता, २०२६ उपांत्य फेरी) अव्वल स्थानी आहे. तिलकरत्ने दिलशानने २००९च्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९६ धावा केल्या होत्या. संजूने आज इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सचा नाबाद ८६ धावांचा ( वि. भारत, २०२२ उपांत्य फेरी) विक्रम मोडला. संजूने सेट केलेल्या पायावर नंतर शिवम व सूर्यकुमार यादव यांनी धावांचा डोंगर उभा केला. सूर्या व शिवम यांनी १५ चेंडूंत ३० धावा जोडल्या. कर्णधार ११ धावांवर यष्टिचीत झाला.
भारताने १६.५ षटकांत फलकावर दोनशे धावा पूर्ण केल्या. हार्दिक पांड्याच्या नो लूक शॉटने सर्वांची वाहवाह मिळवली. शिवम दुबे २५ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांवर रन आऊट झाला. हार्दिकच्या चुकीच्या कॉलचा त्याला फटका बसला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकचा झेल उडालेला, परंतु बँटनने तो सोडला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात तीन वेळा रन आऊट होणारा शिवम हा दुसरा फलंदाज ठरला. महेंद्रसिंग धोनी २००७ मध्ये तीन वेळा रन आऊट झाला होता. तिलक व हार्दिकने टीम इंडियाला २० षटकांत ६ बाद २५३ धावांपर्यंत पोहोचवले. तिलकने १९व्या षटकात जोफ्रा आर्चरला तीन षटकार खेचले. तिलक ७ चेंडूंत २१ धावा करून माघारी परतला. हार्दिकही १२ चेंडूंत २७ धावांवर रन आऊट झाला.