जगाला हादरवून सोडणारी एक अत्यंत मोठी लष्करी कारवाई समोर आली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पडली असून, इस्रायलने थेट इराणची राजधानी तेहरानवर महाभयंकर मिसाईल हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड घबराट पसरली असून राजधानीत एकापाठोपाठ एक झालेल्या स्फोटांनी परिसर हादरून गेला आहे. या हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी आहे की, यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. या हल्ल्यानंतर इस्रायलने कोणत्याही संभाव्य प्रतिहल्ल्याचा सामना करण्यासाठी आपल्या देशात ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित केली आहे. इस्रायलमधील प्रत्येक शहरात, गल्लीत आणि मुख्य रस्त्यांवर धोक्याचे सायरन वाजवले जात आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी किंवा बंकरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडींवरून इस्रायल आता पूर्णपणे युद्धाच्या भूमिकेत (War Mode) असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. इस्रायलच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता इराण काय पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. इराणने जर या हल्ल्याचा लष्करी भाषेत बदला घेतला, तर याचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/02/28/big-change-from-march-1-railway-ticket-booking-upi-payment-lpg-cylinder-price-what-will-change/
इस्रायलमध्ये आणीबाणी लागू
इराणच्या संभाव्य हल्ल्याचा धोका ओळखून इस्रायलने केलेल्या ‘प्रीएम्पिटिव्ह स्ट्राईक’ (प्रतिबंधात्मक हल्ला) नंतर संपूर्ण पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्याला इराणकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळण्याची दाट शक्यता असल्याने इस्रायल सरकारने संपूर्ण देशात तातडीने आणीबाणी (Emergency) लागू केली आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) दिलेल्या माहितीनुसार, शत्रूचा प्रतिहल्ला कोणत्याही क्षणी होऊ शकतो, या भीतीने संपूर्ण देश सध्या ‘हायअलर्ट’वर आहे. इस्रायलमधील परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर असून, देशभरातील शहरे आणि गल्ल्यांमध्ये धोक्याचे सायरन सतत वाजत आहेत. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, प्रत्येकाच्या मोबाईलवर सतर्क राहण्याचे आणि तात्काळ सुरक्षित स्थळी किंवा ‘बॉम्ब शेल्टर’मध्ये जाण्याचे संदेश धडाधड पाठवले जात आहेत. नागरिकांमध्ये घबराट असली तरी प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लष्करी सुरक्षेचा उपाय म्हणून इस्रायलने आपले हवाई क्षेत्र (Airspace) सर्व प्रकारच्या नागरी उड्डाणांसाठी पूर्णपणे बंद केले आहे. याचा अर्थ असा की, आता इस्रायलमधून कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही आणि बाहेरून येणाऱ्या विमानांनाही तिथे उतरण्याची परवानगी नसेल.
अलर्ट राहा…नागरिकांना ‘प्रोएक्टिव्ह’ सतर्कतेचा इशारा
इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) आपल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ‘प्रोएक्टिव्ह अलर्ट’ जारी केला आहे. हा केवळ इशारा नसून कोणत्याही संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी केलेली पूर्वतयारी आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी भीषण मिसाईल किंवा ड्रोन हल्ला होऊ शकतो, अशी दाट शक्यता आयडीएफने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी किंवा ‘बंकर’मध्ये आश्रय घ्यावा, अशा सूचना मोबाईल मेसेजद्वारे धडाधड पाठवल्या जात आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी संपूर्ण देशात राष्ट्रीय स्तरावर आणीबाणी घोषित केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात युद्धाचे सावट पसरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ,इस्रायलने सुरक्षेचा कडक उपाय म्हणून आपले हवाई क्षेत्र (Airspace) पूर्णपणे सील केले आहे. इतकेच नाही तर, इस्रायलच्या हवाई हद्दीत किंवा सीमाभागात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नका, असे कडक आवाहन जगातील सर्व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना (Airlines) करण्यात आले आहे. इस्रायलमधून होणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून, देश आता बाह्य जगापासून हवाई मार्गाने तुटला आहे. ही संपूर्ण तटबंदी केवळ इराणच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी करण्यात आली आहे.
शाळा-कॉलेजांना सुट्टी, वर्क फ्रॉम होमचे आदेश
खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर कडक बंदी घालण्यात आली असून, नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ (घरातून काम) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची हालचाल मर्यादित राहील. दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरान इस्रायलच्या भीषण हल्ल्याने हादरून गेली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील अत्यंत गजबजलेल्या ‘यूनिव्हर्सिटी स्ट्रीट’ (University Street) आणि ‘जोमहुरी’ (Jomhouri) परिसरात मिसाईलचा थेट मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत. इराणच्या अधिकृत सरकारी प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, तेहरानमध्ये किमान तीन प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे स्पष्ट केले आहे. हे स्फोट नेमके कुठे झाले आणि त्यात किती प्रमाणात जीवित किंवा वित्तहानी झाली आहे, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या हल्ल्यामुळे इराणच्या संरक्षण यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, आता इराण यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.