Home संपादकीय अग्रलेख संशयाचं धुकं

संशयाचं धुकं

0
संशयाचं धुकं

विमानाचा ब्लॅक बॉक्स आगीत जळाल्याची माहिती आल्याने या प्रकरणाच्या चर्चेत आणखी वाढ झाली. तथ्य किती किंवा शक्यता किती याचा विचार न करता अशा चर्चांत मग प्रश्नांची भर पडत जाते. सध्या नेमकं हेच सुरू आहे. ते सहजपणे दुर्लक्ष करण्यासारखं नाही.

अजितदादांच्या अपघाती निधनाने सामान्य माणूस अजूनही बुचकळ्यात आहे. एखाद्या अनपेक्षित घटनेचा धक्का एवढा मोठा असतो, की घटना घडून गेल्यानंतरही बरेच दिवस ती घटना मनाला स्वीकारता येत नाही. सत्य कळत असतं, पण त्यावर विश्वास ठेवायला मन तयार नसतं. एका बाजूला अनपेक्षित, अविश्वसनीय घटना आणि त्यानंतर समाज माध्यमांवरून फिरत असलेल्या अजितदादांच्या अनेक चित्रफिती. त्यात भर आमदार रोहित पवार यांच्याकडून व्यक्त होत असलेल्या संशयाची. अपघात हे खरं तर अतार्किकच असतात. त्यामुळे, तर्काने त्यात अनेक प्रश्न उपस्थित होतच असतात. काही सर्वसामान्यांच्या मनात असलेले प्रश्न, काही तज्ज्ञांचे प्रश्न, आपल्याकडे प्रत्येक व्यवस्थेत असलेल्या अव्यवस्था आणि नेमक्या त्याच दिवशी घडलेल्या काही अपवादात्मक त्रुटी या सगळ्यांची गोळाबेरीज रोहित यांच्या प्रश्न आणि संशयात असल्याने त्या अपघाताभोवतीचं गूढ वाढत चाललं आहे. रोहित यांच्या आरोपवजा प्रश्नांना सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उत्तरं दिली. पण, तरीही रोहित यांच्या पत्रकार परिषदा थांबेनात आणि त्यांच्या समर्थनार्थ अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवारही आले, तेव्हां राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तरं द्यायला सुरुवात केली. रोहित यांच्या नेमक्या प्रश्नांना खरे तर हवाई वाहतूक विभागाशी संबंधित यंत्रणांनी उत्तर द्यायला हवं होतं किंवा निदान तज्ज्ञांचे अहवाल येईपर्यंत वाट बघण्याचं आवाहन तरी करायला हवं होतं. पण, विमान ज्या खासगी कंपनीचं होतं, त्या कंपनीने आपल्या बाजूने अजून तरी कोणतीच वस्तुस्थिती उघड न केल्याने आणि हवाई प्रवासी वाहतूक विभागाशी संबंधित नियंत्रक संस्थांनीही अजून तपासातील प्रगती अधिकृतरीत्या जनतेसमोर न ठेवल्याने रोहित यांच्या प्रश्नांची धार वाढत चालली आहे. सर्वसामान्य माणसालाही त्यामुळे काही प्रश्न पडू लागले आहेत.

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्याविषयी पहिली शंका व्यक्त केली, ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी. ममता यांचा संशय पसरू नये आणि या दुःखद घटनेला वेगळं वळण लागू नये, तो राजकारणाचा विषय होऊ नये, यासाठी शरद पवार यांनी तातडीने माध्यमांसमोर येऊन खुलासा केला. पण, त्यानंतर ही जबाबदारी खुद्द त्यांचे नातू रोहित यांनीच घेतली! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आमदार अमोल मिटकरी ही या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित करणारी दुसरी राजकीय व्यक्ती होती. ममतादीदींनी विषय नंतर सोडून दिला. मिटकरीही फार बोलले नाहीत. पण, रोहित या संदर्भातील तांत्रिक व परिस्थितीजन्य माहिती गोळा करू लागले. खासगी गुप्तहेरांमार्फतही काही माहिती गोळा करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी माध्यमांसमोर सादरीकरणही केलं आणि त्याला धरून रोज काही ना काही मुद्दे मांडत राहिले. त्यामुळे संशयाचं वादळ मनामनांत घोंघावतं आहे. घराघरांत त्याची चर्चा सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स आगीत जळाल्याचं सांगितलं गेल्याने अविश्वासात भर पडली आहे. तथ्य किती किंवा तथ्याच्या शक्यता किती, याचा विचार न करता अशा चर्चांत मग प्रत्येकाच्या डोक्यातील प्रश्नांची भर पडत जाते. सध्या नेमकं हेच सुरू आहे. ते सहजपणे दुर्लक्ष करण्यासारखं नाही.

रोहित पवार आणि अजितदादांचं कुटुंब तांत्रिकदृष्ट्या वेगवेगळ्या पक्षात आहेत. रोहित आणि अजितदादांच्या पक्षातील ‘अन्य’ नेत्यांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरही दादांच्या मृत्यूनंतर वाद झाला होता. त्यामुळे, रोहित यांच्या या आरोपांनाही त्या नेत्यांकडून त्याच पद्धतीने उत्तरं दिली जातील, असं वाटत असतानाच एके दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पार्थ पवार आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. त्यांनी या अपघाताची सीबीआय या केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. अजितदादांनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री असताना, संपूर्ण पक्ष सत्ताधारी महायुतीत सहभागी असताना आणि फडणवीस यांच्यासोबत एकूण एक पक्षाचे मधुर संबंध असताना अचानक ही मागणी का व्हावी? रोहित यांना रोखण्यासाठी, पक्षांतील खदखद थांबवण्यासाठी, की हितचिंतक मतदारांना दिलासा देण्यासाठी? फडणवीस यांचा दिल्ली दौरा ठरला होताच. त्यामुळे, त्यांनीही या शिष्टमंडळाला ‘माझी केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर भेट होणार आहे. आपली मागणी मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवतो’ असं आश्वासन दिलं. पुढे काय? ते थोड्याच दिवसांत कळेल.

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाल्यापासून या दोन्ही पक्षातले संबंध त्या पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांतील भावनिक संबंधांवर हेलकावे खात होते. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाचा विषयही त्याचाच भाग होता. आपल्याबरोबरच्या नेत्यांचं काहीही मत असलं, तरी पक्षाच्या अगदी खालच्या थरातील कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या मनात काय आहे, याची कल्पना अजितदादांना होती. १२ फेब्रुवारीचा मुहूर्त त्यांनी म्हणूनच नक्की केला होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रचारसभांत ते या एकत्रिकरणाबद्दल उपस्थित जनसमुदायाला आश्वासित करत असत. त्याचे अनेक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर भरपूर फिरताहेत. राजकारण्यांसाठी राजकीय सोय सर्वाधिक महत्त्वाची असते. ते साहजिकही आहे. राष्ट्रवादीचे दोन भाग झाले, ते या सोयीसाठी आणि आता त्या पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रिकरणाच्या विचारापासून पक्षाला शक्य तितक्या लांब घेऊन जाऊ पाहताहेत, तेही त्यासाठीच. अपघाताबद्दलचे प्रश्न आणि त्याच्या चौकशीच्या मागण्या या सोयी – गैरसोयीचा भाग होऊ नयेत, एवढीच घराघरांतल्या सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असेल.