हायकोर्टात बंपर भरती; महाराष्ट्र बांबू धोरण २०२५ जाहीर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेसाठी ५०० कोटींची तरतूद
मुंबई: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (१४ ऑक्टोबर) तीन महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले. उद्योग, सामाजिक न्याय आणि विधि व न्याय विभागांशी संबंधित या निर्णयामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून, ऐतिहासिक शैक्षणिक वारसा जपला जाणार आहे.
मुंबईसह राज्यातील उच्च न्यायालयांसाठी तब्बल २ हजार २२८ नवीन पदे निर्माण करणे, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करणे हे प्रमुख निर्णय आहेत.
न्यायव्यवस्थेत बंपर भरती: २,२२८ नवी पदे
मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधि व न्याय विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईतील मूळ शाखा, अपील शाखा तसेच नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठांसाठी गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात एकूण २ हजार २२८ नवीन पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
न्यायालयीन कामकाजात गतीमानता आणण्यासाठी तसेच माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ही पदे आवश्यक होती. या निर्णयामुळे विधि व न्याय विभागातील मनुष्यबळाची गरज पूर्ण होणार असून, २ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. आज मंजूर झालेल्या पदांपैकी मुंबई मूळ शाखेसाठी ५६२, अपील शाखेसाठी ७७९, छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी ५९१ आणि नागपूर खंडपीठासाठी २९६ पदांचा समावेश आहे. या पदनिर्मितीसाठीच्या वेतन अनुदानासह अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
बांबू धोरणातून ५०,००० कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार
राज्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखाच शाश्वत आणि पर्यावरणपूरक उत्पन्नाचा एक नवा पर्याय मिळावा यासाठी ‘महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५-३०’ जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ ला सुसंगत असलेले हे धोरण पुढील पाच वर्षांसाठी राबविले जाईल. या धोरणाच्या माध्यमातून पुढील १० वर्षांत राज्यात तब्बल ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ५ लाखांहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हे पण वाचा : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाकडून तिघांना जामीन; सर्वच्या सर्व ‘१२’ संशयित आरोपींची सुटका!
या धोरणाअंतर्गत राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स (समूह) आणि दुर्गम भागातील कारागिरांसाठी सूक्ष्म सामायिक सुविधा केंद्रे (MCFC) स्थापन करण्यात येतील. बांबू शेतकरी उत्पादक संघटना (FPO), कंत्राटी शेती आणि विविध क्षेत्रांमध्ये बांबूच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल.
तसेच, बांबू प्रक्रिया उद्योगांना व्याज अनुदान, वीज अनुदान आणि मुद्रांक शुल्क सवलती दिल्या जाणार आहेत. विशेषतः बांबू क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी (MSME) व्हेंचर भांडवल निधी म्हणून ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली. बांबू लागवडीखालील क्षेत्रात महाराष्ट्राचे देशात तिसरे स्थान असून, या धोरणासाठी चालू आर्थिक वर्षात ५० कोटी आणि संपूर्ण अंमलबजावणीसाठी १,५३४ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी मिळाली आहे.
डॉ. आंबेडकरांच्या संस्थेसाठी ५०० कोटींचा विशेष निधी
तिसरा आणि अत्यंत भावनिक निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या विकासासाठी स्वतंत्र विशेष योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सोसायटीच्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण संस्था आणि वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.
या योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ९ शिक्षण संस्था (यात मुंबईतील सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सिद्धार्थ नाईट हायस्कूल, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा आणि छत्रपती संभाजीनगरमधील मिलिंद कला महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय, मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल, मिलिंद प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल) आणि छत्रपती संभाजीनगर येथील २ वसतिगृहे (अजिंठा बॉईज होस्टेल आणि प्रज्ञा मुलींचे वसतिगृह) यांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे.
पुढील पाच वर्षांत दरवर्षी १०० कोटी रुपये याप्रमाणे एकूण ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या कामांसाठी करण्यात आली आहे. हा निधी डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक वारसा जपण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.
सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – ३) पुढे पहा…