सहजच : शुभांगी मांडे खारकर
“गोमू संगतीनं माझ्या तू येतेस का?”
“आले, आले. काय छान हवा सुटली आहे रे आणि ऊन पण किती मस्त आहे. मेला पाऊस तरी असतो नाहीतर थंडी. उन्हात फिरायला काय छान वाटतंय.’’
गोमू आणि तिचा गोम्या नदीच्या काठावर डुलत डुलत चालले होते.
“ते पाहिलंस का? स्वेटर, टोपी, मफलर घालून लोक कसे फिरत आहेत.’’
“अगं गोमू, ते परदेशी प्रवासी आहेत. त्यांना कुठे सहन होते आपली थंडी? म्हणून इतका जामानिमा करून येतात.”
“गोमू… ए गोमू किती मागे मागे राहतेस?’’
“इतकं काही ओरडायला नको ह. फिरायला जायचं तर थोडं रमत गमत चाललं तर काय बिघडतं?”
“गोमू, परवा तर किती मागे राहिली होतीस आणि आता पण थांबली आहेस. किती तो फोटोचा सोस! तरी बरं मध्ये एकदा खास फोटो सेशन करून घेतलं होतस.’’
गोम्या बडबड करत होता तरी पण गोमुने फोटो काढणाऱ्या त्या हौशी बाईला छान छान पोजेस दिल्याच.
“गोमू, येतेस की मी जाऊ?’’
गोमुच्या गोम्याने रागावून विचारलं आणि गोमू लुटूलुटू चालत गोम्याजवळ पोहोचली.
गोमुच्या गोम्याने तिच्याकडे लटक्या रागाने पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहून गोड हसली. पाहता पाहता त्या दोघांनी पाण्यात छान सूर मारलाही. पण मला गोमुच्या गोम्याचा रागच आला. इतक्या सुंदर गोमुचे अजून थोडे फोटो काढू द्यायला हवे होते ना त्याने. लब्बाड कुठला!!