Home साप्ताहिक कोलाज मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

ओंजळ : पल्लवी अष्टेकर

मानसिक आरोग्य म्हणजे आपले भावनिक, मानसिक व सामाजिक कल्याण होय. चांगले मानसिक आरोग्य राखणं हे सर्वांच्याच आरोग्यासाठी आवश्यक आहे. परिपूर्ण व संतुलित जीवन जगण्यासाठी व्यक्तीने मानसिक आरोग्याची काळजी घेणे जरूरीचे आहे. आपल्या दैनंदीन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो. यात आव्हानांचा सामना करणे, लवचिकता निर्माण करणे व आवश्यकतेनुसार समर्थन मिळवणे समाविष्ट आहे.

आपली विचारप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. आपण आपल्याबाबतीत जसा विचार करू, तसेच आपले प्रोग्रॅमिंग होत असते. विचार प्रक्रिया यात धारणा, लक्ष, स्मृती, तर्क समस्या सोडविणे व निर्णय घेणे यांसारख्या विविध मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो.

विचार प्रक्रियेमध्ये आपला मेंदू निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले अनुभव, धारणा व आठवणींमधून माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन व प्रक्रिया करण्यात गुंतलेल्या संज्ञात्मक क्रियाकलपांचा समावेश होतो.

व्यक्तीच्या वर्तनाची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. एखाद्या व्यक्तीचे वर्तन आनुवंशिकता, पर्यावरण, भूतकाळातील अनुभव, भावना यांसारख्या विविध घटनांनी प्रभावित असते. आपले अंतर्गत विचार संज्ञानात्मक यंत्रणेद्वारे आपल्या मेंदूमध्ये प्रक्रिया करतात. आपला वर्तनात्मक प्रतिसाद किंवा कृती ही परस्परांशी संलग्न असते. मानवी संबंध विकसित करण्यामध्ये इतरांशी सकारात्मक संबंध निर्माण करणे व राखणे यांचा समावेश आहे. लोकांशी तुमचे संबंध सुधारण्यात मदत करण्यासाठी काही बाबी सांगितल्या आहेत. यात इतर व्यक्ती बोलत असताना त्याकडे पूर्ण लक्ष द्या. आवड दाखवा व योग्य प्रतिसाद द्या. इतरांसोबत दयाळूपणे व आदरयुक्त वागा. त्यांच्या मतांचे व सीमांचे आदर करा. तसेच स्वत:ला स्पष्टपणे व आदरपूर्वक व्यक्त करा. इतरांशी खुल्या व प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन द्या. तुमच्या कृती व वचनांमध्ये सातत्य ठेवा. विश्वासार्ह राहा. समस्या वाढविण्याऐवजी त्यातून मार्ग कसा निघेल हे शोधा. इतरांच्या प्रयत्नांबद्दल व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तसेच खुल्या मनाचे आणि भिन्न व्यक्तिमत्त्वे व परिस्थितीशी जुळवून घेण्याची इच्छा बाळगा.

‘मानसिक आरोग्य’ म्हणजे अशी स्थिती, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताण-तणावांचा सामना करू शकेल. सुफल व उत्पादनक्षमरीत्या कार्यशील राहील. समाजाप्रती योगदान देऊ शकेल. या व्याख्येत व्यक्तीच्या जीवनातील मानसिक स्वास्थ्याचे अविभाज्य अस्तित्व आणि त्याचा सखोल व दूरगामी प्रभाव दिसून येतो.

किशोरावस्था (मुले) आणि प्रोढावस्था (प्रौढ) या दोघांच्या स्थित्यंतरात एक आव्हानात्मक टप्पा असतो तो म्हणजे ‘तारुण्यावस्था’. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुले काॅलेजात गेल्यावर मोठ्या जगाशी संबंध वाढतो. कोणती शाखा घ्यायची? पुढे कशात करिअर करायचे? यामुळे ताण-तणाव निर्माण होण्याची शक्यता दाट असते. तसेच या वयात मुला-मुलींचा बंडखोर स्वभाव उफाळून येतो. मतभिन्नतेमुळे मुले व पालक यांच्यात काही वेळा संघर्षाचे प्रसंग उफाळून येतात. त्यामुळे हे नाते अधिक संवेदनशील होते. त्यामुळे दोघांनाही समुपदेशनाची गरज असते.

आज तरुण पिढीचे आयुष्य आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या क्लिष्ट झाले आहे. तसेच मध्यम वयात मुलं झाल्यानंतर अनेक बायकांना नोकरी सोडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताण जाणवतो. अशावेळी स्त्रीचा बौद्धिक कोंडमारा होतो. सामाजिक क्षेत्र संकोचते, जीवनक्रम बदलतो व मानसिक आरोग्य धोक्यात येते. मुलांचे संगोपन हा फक्त स्त्रीचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाचा आहे. पाळणाघर उपलब्ध नसल्याने नोकरी सोडावी लागणाऱ्या तरुणींमध्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिक आहेत. पती-पत्नीने सामंजस्याने सोडवावा असा प्रश्न आहे. तसेच वृद्धापकाळात अनेक शारीरिक व्याधी व मानसिक आजार संभवतात. मानसिक आजारात एकलकोंडेपणा, आधारहीनता, तसेच आत्मविश्वास कमी झाल्याची भावना जास्त असू शकते. त्यामुळे सर्वांच्यात मिसळून वागण्यामुळे अनेक समस्यांवर वृद्ध मंडळी मात करू शकतात.

आधुनिक मानसशास्त्रज्ञाचे जनक सिगमंड फ्राॅईड यांच्या मते आपल्या मनाचा काहीसाच भाग आपल्याला ज्ञात असतो व उरलेला बराचसा अज्ञात असतो. त्यांनी ‘इड’, ‘इगो’ व ‘सुपर इगो’च्या संकल्पनाही मांडल्या. इडमध्ये बेलगाम इच्छा यांचा समावेश असतो. इगो सत्यतेच्या तत्त्वावर कार्यरत असतो, विवेकवादी असतो. त्यामुळे इगो इडवर सतत लगाम ठेवून असतो.

मनाचा तिसरा थर सुपर इगो म्हणजे नीतिमत्ता, आदर्श, सामाजिक बंधने इ. समावेश असतो. इड व सुपर इगोच्या थरांमध्ये विवेकी समतोल राखण्याचे काम इगोचे असते. मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वावर त्याला लाभलेल्या पालकत्वाचा, समाज, काळ, संदर्भ, इतिहास, धर्म व कला यांचा प्रभाव पडतो.

मानस शास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांचे म्हणणे असे होते की, प्रत्येक मानसिक प्रक्रियेचे काहीतरी प्रयोजन व कार्य असून, मानसिक जीवन आणि वर्तन हे व्यक्तीच्या सक्रियरीत्या जुळवून घेण्याशी निगडित आहे. आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, जेव्हा व्यक्ती-व्यक्तीमधील बदल व भिन्नता जितक्या सहजतेने, सातत्याने, धैर्याने व धीराने स्वीकारले जातील. आपल्या आयुष्यातील तणाव हाताळण्यासाठी काही गोष्टी जरूर कराव्यात. जसे की, नियमित शारीरिक व्यायाम करणे. दीर्घ श्वास घेण्याच्या व्यायामाचा सराव करणे. ध्यानासारख्या विश्रांती तंत्राचा अवलंब करणे, पुरेशी झोप घेणे इ. औषधे, थेरपीज व जीवनशैली यांच्या मदतीने, तज्ज्ञांच्या सहाय्याने आपण मानसिक समस्यांवर उपचार घेऊ शकतो.

स्वीकारामुळे नकारात्मक भावना, ताण-तणावाची परिस्थिती आपण व्यवस्थित हाताळू शकतो. आपल्या सकारात्मक विचारसरणीमुळे नाती सुधारतात. स्वराली व तिच्या सासूबाईंनी आपल्या नात्यातले बंध घट्ट केले आहेत. आयुष्यात अनेकदा मतभेदांचे प्रसंग आले; परंतु त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या दोघींच्या संबंधावर होऊ दिला नाही. स्वरालीला नोकरी करण्याची खूप हौस होती. सासूबाईंनी तिला नोकरी करून दिली. तिच्याशी तुलना न करता त्या घरकामात स्वरालीला मदत करायच्या. ती देखील एखादी वस्तू सासूबाईंसाठी आवर्जून घ्यायची. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले असायचे.

समाजात आपण कितीतरी वेळा पाहतो की, संयुक्त कुटुंबांची विभागणी होऊन त्रिकोणी किंवा चौकोनी घरं बनत आहेत. नात्यातील दुराव्यांमुळे अनेक मानसिक समस्या उद्भवत आहेत. यावर मात करायची असेल तर नाती सुदृढ ठेवणे आवश्यक आहे.

आपले मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, म्हणूनच आपल्या कार्यांना प्राधान्य द्या आणि ते नीट करा. आपल्या मानसिक व भावनिक कल्याणासाठी पुरेशी झोप घ्या. भूतकाळ सोडावा व जास्तीत जास्त वर्तमानकाळात जगण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या भवितव्यासाठी चांगले विचार ठेवा. तणाव जास्त असल्यास व्यावसायिक तज्ज्ञांकडून थेरपी किंवा समुपदेशन घ्या. चांगली सामाजिक कौशल्ये विकसित करा.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानसिक आरोग्य म्हणजे निव्वळ मानसिक आजारांपुरते संबंधित नाही, तर तुम्हाला स्वत:बद्दल चांगले वाटणे, ताण-तणावांचा सामना करू शकणे व नाती चांगल्या प्रकारे जोपासणे असा होय. चला तर मग, मानसिकदृष्ट्या सफल आयुष्य जगूया.

(लेखिका समाजसेवा विषयात M.S.W. व मनोवैद्यकीय क्षेत्रात M.Phil आहेत.)