Home ताज्या घडामोडी सातारा हादरले : अठरा वर्षांच्या शुभमचा मैदानात मृत्यू, क्रिकेट खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास!

सातारा हादरले : अठरा वर्षांच्या शुभमचा मैदानात मृत्यू, क्रिकेट खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास!

सातारा हादरले : अठरा वर्षांच्या शुभमचा मैदानात मृत्यू, क्रिकेट खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास!

पाटण, सातारा  : एकीकडे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले… आणि दुसरीकडे, घराचा आधार असलेल्या अठरा वर्षांच्या शुभम सुरेश कदम याने क्रिकेटच्या मैदानावरच आयुष्याला रामराम ठोकला. देशपांडेवाडी (किसरुळे) या गावात घडलेली ही घटना सातारा जिल्ह्याला हादरवून गेली आहे.

नेहमीप्रमाणे शुभम संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना अचानक त्याला थकवा जाणवू लागला. तो मैदानातच खाली बसला, पण काही क्षणातच अस्वस्थ होत खाली कोसळला. उपस्थित मित्रांनी आणि ग्रामस्थांनी वेळीच प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्याला तात्काळ हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, तिथेही काही फरक पडला नाही. नंतर कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान शुभमने अखेरचा श्वास घेतला.

https://prahaar.in/2025/06/04/11-killed-25-injured-in-fan-stampede-outside-chinnaswamy-stadium-for-rcb-victory-parade/

शुभम पाटण येथील शासकीय तंत्रनिकेतन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होता. खेळकर, मनमिळावू स्वभावाचा शुभम मित्रांमध्ये लोकप्रिय होता. पण नियतीने त्याच्या तरुण वयातच खेळ संपवला. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.

घरात वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले, आई, आजी आणि लहान बहीण… आणि घरचा एकुलता एक मुलगा शुभम, जो आता केवळ आठवणींमध्ये उरला. कदम कुटुंबावर काळाचा घाला कोसळला असून, अंत्यसंस्कारावेळी गावकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते.