चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४९व्या सामन्यात चेन्नईला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रेयस अय्यरच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला ४ विकेट राखत हरवले.
श्रेयस अय्यरने ४१ बॉलमध्ये ७२ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. त्याआधी प्रियांश आर्य आणि प्रभासिमर सिंग यांनी चांगली सुरूवात पंजाबला करून दिली. प्रियांश आर्यने २३ धावा केल्या तर प्रभासिमरनने ५४ धावा केल्या. त्यानंतर अय्यरने तुफानी खेळीला सुरूवात केली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने १९१ धावांचे आव्हान ४ विकेट राखत पूर्ण केले.
महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. या पराभवासोबतच चेन्नई सुपर किंग्स संघ या स्पर्धेबाहेर गेला आहे.
चेन्नई सुपर किंग्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १९० धावा केल्या होत्या. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या चेन्नईची सुरूवात चांगली नव्हती. तिसऱ्याच षटकांत चेन्नईला पहिला झटका बसला. शेख रसीदला अर्शदीपने बाद केले. रसीदने केवळ ११ धावा केल्या. यानंतर पुढच्याच षटकांत आयुष म्हात्रेने आपली विकेट गमावली. यानंतर जडेजा चांगल्या लयीमध्ये दिसत होता. मात्र सहाव्या षटकांत बरारने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जडेजाने केवळ १७ धावा केल्या. दरम्यान, सॅम करन आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात चांगली भागीदारी झाली. दरम्यान, १५व्या षटकांत ब्रेविसची विकेट पडली आणि ७८ धावांची भागीदारी संपली. दुसरीकडे सॅम करन टिकून होता. सॅम करनने ३० बॉलमध्ये अर्धशतक ठोकले.