मुंबई : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीचे रुंदीकरण तसेच खोलीकरण करून या नदीला पुनर्रुज्जीवन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींहून खर्च करण्यात आले आहे. तरीही दरवर्षी मिठी नदीतील गाळ सफाईवर सरासरी ९० कोटी रुपये खर्च केले जात असून या गाळ सफाईच्या कामातील अनियमिततेबाबत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. त्यातच मिठी नदीच्या सफाईच्या कामांतील घोटाळ्यांचे आरोप होत असल्याने आता मिठी नदीच्या सफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सफाई पूर्वीच ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे सफाई पूर्वी आणि सफाईनंतर ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केले जाणार असल्याने आकाशातून लक्ष ठेवले जाणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून या मिठी नदीतील गाळ काढण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. यासाठी दरवर्षी पालिकेच्या वतीने निविदा मागवल्या जात आहे. मात्र, यंदाही निविदा मागवताना त्यामध्ये नदीतून गाळ काढण्यासाठी १०५ फूट लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर क्षमतेचे बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करण्याची अट घालण्यात आल्याने ही निविदा चर्चेत आली. याप्रकरणी न्यायालयातही याचिका करण्यात आली असून तत्पूर्वीच महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने याचिका कर्ता कंपनीकडे पोकलेन मशिनची एनओसी नसल्याने त्यांची निविदा जी प्रतिसादात्मक ठरवण्यात येणार नव्हती, ती निविदा प्रतिसादात्मक ठरवली जाईल असे कळवले. त्यामुळे हा तिढा सुटला असला तरी याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, मागील वर्षी मिठी नदीच्या सफाईकरता ८९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते, तर यावर्षी ८४ कोटी रुपयांचा अंदाज तयार करून निविदा निमंत्रित केली आहे. ही निविदा अंतिम टप्प्यात असून यातील अट मात्र कायम ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे मिठी नदीची तीन टप्प्यात सफाई केली जाणार असून या सफाईसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांना कार्यादेश देण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून सर्व भागांचे चित्रण केले जाणार आहे. तसेच मिठीची पावसाळ्यापूर्वी सफाई पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्रोनमार्फत चित्रण केले जाईल. जेणेकरून कोणत्याही भागांमध्ये सफाईपूर्वी गाळाची स्थिती काय होती आणि नंतर काय आहे याची माहिती मिळू शकते. मिठीच्या काही भागांमध्ये झोपडपट्टी परिसर असल्याने त्याठिकाणी शिल्ट पुशर मशिन तसेच ट्रक्चल यांचा वापर केला जात नाही. त्यामुळे पूर्वीची मिठी आणि सफाई नंतरची मिठीचे स्वरूप आकाशातूनही पाहता येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.