लहान चिमुरड्यांसह महिलांचा समावेश
पेण : काही दिवसांपुर्वी उरण येथील तरुणी यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हीची क्रूरतेने हत्या केली गेली, या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच पेणमध्ये देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व संपूर्ण पेणकरांच्या माध्यमातून मुक मोर्चाची हाक देण्यात आली होती. या मुक मोर्चाला लहान लहान चिमुरड्यांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, शिवाय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य मावळे आणि विविध सामजिक संघटनांचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून, तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फिती लावून सदर मुक मोर्चा महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, नगर पालिका, बाजारपेठ अशा मार्गाने पेण पोलीस ठाण्यापर्यंत नेऊन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात कोणतीही महिला हरवली तर चोवीस तासांच्या आत तिची तक्रार दाखल करून घेण्यात यावी. महिलांसाठी जे कायदे केले आहेत ते कठोरपणे राबविण्यात यावेत, महिलांसाठी खास कमिटी तयार करून त्यांचे तक्रार निवारण करण्याचे काम शासन आणि गृह मंत्रालयाने करावे, अशा प्रकारच्या क्रूर घटनांचा जलद गती न्यायालयामध्ये खटला चालऊन तत्काळ फाशीची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या मुक मोर्चामधुन कऱण्यात आल्या आहेत.
याबाबत पेण पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांनी बोलताना सांगितले की, पेण शहरात कोणत्याही प्रकारची महिलांना समस्या निर्माण झाली किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबियांना ज्या गोष्टी सांगु शकत नसाल तर घाबरून न जाता पोलीस स्टेशन बरोबर संपर्क साधा. त्यातुन आपण योग्य तो मार्ग काढू शकू असेही सांगितले.