Home ब्रेकिंग न्यूज पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’ची घटना

पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’ची घटना

पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’ची घटना

आलिशान कारची स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

बस चालकाला अटक, कारचा चालक फरार

पुणे (पिंपरी) : पिंपरी-चिंचवड शहरातील सायन्स पार्कसमोर स्कूल बस आणि आलिशान गाडीचा भीषण अपघात झाला. ही दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले असून अन्य १३ विद्यार्थी सुखरूप आहेत. या अपघातामुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर बस चालकाला अटक केली आहे. मात्र आलिशान गाडीचा चालक फरार झाला आहे. सध्या पिंपरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सोमवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सायन्स पार्कसमोर १५ विद्यार्थी असलेली स्कूल बस बीआरटी लेनमध्ये जात असताना समोरून येणाऱ्या आलिशान चारचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेमुळे स्कूल बसमधील विद्यार्थी घाबरले होते. या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले असून वेळेत सावधानता बाळगल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अपघातात स्कूल बसची समोरील भागाचा चक्काचूर झाला असून समोरील काचही पूर्ण फुटली आहे. तर समोरुन येऊन धडकलेल्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी दाखल झाले आणि आपापल्या पाल्याला सुखरूप घरी नेले. बसच्या चालकाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिंपरी पोलिसांनी सांगितले की, पोदार इंटरनॅशनल स्कूलची ही बस पंधरा विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. अपघाताच्या वेळी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आणि ते घाबरले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून बचावकार्य सुरू केले.

बस चालक आणि कार चालक या दोघांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर येत आहे. ही धडक एवढी भीषण होती की बसच्या धडकेने कारचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, पिंपरी पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे.