Home ताज्या घडामोडी पेण-खोपोली मार्गावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस!

पेण-खोपोली मार्गावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस!

पेण-खोपोली मार्गावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस!

पेण : पेण-खोपोली मार्ग नव्याने झाल्यापासून येथे पुणे, लोणावळा येथून येणारे पर्यटक व स्थानिक वाहनचालक आपल्या वाहनाच्या वेगावर मर्यादा न ठेवता अगदी बेदरकारपणे सुसाट आपल्या गाड्या चालवतात. सदर मार्गावर छोटेमोठे अपघातही झाले आहे. रस्त्यावर फिरणारी कुत्री वाहनचालकांच्या गाडीसमोर येतात. परंतु कुत्री समोर आल्याने, त्यांना वाचवताना एखाद्यावेळी वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने, संबंधित विभागाकडून तसेच स्थानिक ग्रामपंचायतीकडून या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहनचालकांकडून बोलले जाते.

पेण-खोपोली महामार्गाचे कामार्ली गावाजवळ जागेअभावी रस्त्याचे काही काम झाले नसल्याने, या मार्गावर संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे, तर पेण-खोपोली मार्गावर आंबेघर, धामणी, सावरसाई, सापोली, मांगरूळ कामार्ली, वाकृळ, गागोदे आदी गावे येत असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. तसेच रस्त्याकडेला निर्माण होत असलेले हॉटेल्स, खाद्य दुकाने, चिकन सेंटर या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, कुत्र्यांच्या महामार्गावरील हैदोसामुळे छोटे अपघात सुरूच असून, यापुढे एखाद्यावेळी मोठा अपघात होऊन, यात मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत व महामार्ग विभाग यांनी भटके कुत्रे व रस्त्यावरील स्पीड मर्यादा तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येकडे त्वरित लक्ष देण्यात येण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.