विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाच, शिवसेना- राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार विजयी
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल आज लागला. यात महायुतीच्या सर्वच ९ उमेदवारांचा विजय झाला. तर, महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यामुळे, कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यामध्ये, भाजपाकडे संख्याबळ असल्याने भाजपाचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजपा नेत्यांना होता. तर, महायुती म्हणूनही आमचे सर्वच ९ उमेदवार जिंकतील, असा दावाही भाजपाच्या नेत्यांकडून केला जात होता. भाजपासह महायुतीच्या नेत्यांनाही या विजयाचा विश्वास होता.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उभे असलेल्या १२ उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचा वरचष्मा दिसून आला.
विधानपरिषदेच्या ११ विजयी उमेदवारांची यादी
भाजपा – योगेश टिळेकर, पंकजा मुंडे , परिणय फुके, अमित गोरखे , सदाभाऊ खोत
शिवसेना – भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस – प्रज्ञा सातव
शिवसेना (ठाकरे गट) – मिलिंद नार्वेकर
देवेंद्र फडणवीस यांच्या मॅजिक पॅटर्नची हॅटट्रिक
विधानपरिषद निवडणुकीच्या गणितात देवेंद्र फडणवीसांची जादू कायम असल्याचे पाहायला मिळाले. फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा कायम असल्याचा दिसला. कारण महायुतीचे सर्व ९ उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी २०२२च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न पुन्हा एकदा खरा करून दाखवला. २०२२ ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर शुक्रवारी फडणवीसांनी विजयी हॅट्रिक केली. महत्त्वाचे म्हणजे सलग ५ टर्म आमदार असणारे शेकापचे जयंत पाटील जे शरद पवार पुरस्कृत उमेदवार होते, त्यांनाही महायुती आणि फडणवीसांनी धोबीपछाड दिली.
१० वर्षानंतर पंकजा मुंडेंनी कुटुंबीयांसह विजयाचा उधळला गुलाल
वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पकंजा मुंडेंना तब्बल ५ वर्षांची वाट पाहावी लागली. तत्पूर्वी, २०१४ विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल १० वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात, २०१९च्या पराभवानंतर जवळपास ५ वर्षांचा राजकीय वनवासच त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळे, आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने १० वर्षानंतर पंकजा मुंडेंनी कुटुंबीयांसह विजयाचा गुलाल उधळला.