जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
मानवी जीवनात परमेश्वर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मानवी जीवनाचे केंद्र परमेश्वर आहे. या गोष्टीचे महत्त्व जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मानवी जीवनात जी प्रगती व्हायला पाहिजे, आपल्याला जे सुख-शांती, समाधान मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. विज्ञानाची प्रगती होईल, भौतिक प्रगती होईल, निरनिराळे शोध लागतील, मात्र माणूस सुखी होणार नाही. उलट आतापर्यंत आपला अनुभव असा आहे की, प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंतचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे दिसून येईल की पूर्वी खूप बरे होते व आता खूप अनिष्ट झालेले आहे.
भौतिक प्रगती होऊन सुद्धा-सुख, शांती, समाधान वाढण्याऐवजी कमी कमी होत चाललेले आहे का? याचे कारण एकच. आपण मानवी मन आणि परमेश्वर यांचा कधी विचारच केला नाही. या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या डोळ्यांना दिसत नाहीत. जे डोळ्यांना दिसत नाही ते आपल्याला लक्षातच येत नाही. मी नेहमी सांगतो, mind is out of sight. जे आपल्या डोळ्यांच्या कक्षेत येत नाही ते आपल्या मनाच्या कक्षेत येत नाही. Mind is out of sight so it is out of mind. Parmeshwar is out of sight so it is out of mind. असे झालेले आहे व ह्याचाच दुष्परिणाम असा झाला की, मन आणि परमेश्वराचा कोणी विचारच करत नाहीत. आज लोक फक्त पैशाचा विचार करतात. पैशाने सर्व काही मिळते, सत्ता मिळते, संपत्ती मिळते, मात्र सुख-शांती, आनंद मिळते का? या प्रश्नांचे उत्तर नाही असेच देता येईल. अगदी मोठ्या मोठ्या लोकांना हळूच जाऊन विचारा की तुम्ही सुखी आहेत का? ते सुद्धा म्हणतील कसले काय, मग तुम्ही हे सोडून का देत नाही, असे विचारले तर ते सांगतील सोडले तर पळते आणि धरले तर चावते, अशी आमची स्थिती आहे.
पैसे सुख द्यायला समर्थ नाहीत. केवळ भौतिक प्रगती सुख द्यायला समर्थ नाही व सगळे शोध लागत आहेत ते भौतिक प्रगतीचेच. मन आणि परमेश्वर यांचा कोणी विचारच करत नाही आणि तिथे दुःखाचे मूळ आहे. डॉ. मर्फी याचे कारण Ignorance. किती सुंदर सांगितले आहे बघा. त्यांनी असे सांगितले, जीवनात सगळ्या troubles आहेत, difficulties आहेत, calamities आहेत, दुःख, संकटे या सर्वांचे कारण एकच Ignorance, कशाचे? मानसिक आणि आत्मीक नियमन आणि यावर उपाय म्हणजे सद्गुरूंचे मार्गदर्शन. म्हणूनच ‘‘सद्गुरूवाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी.’’