Home ताज्या घडामोडी Devendra Fadnavis : देशातील महिला पंतप्रधान मोदीचं ‘४०० पार’चं स्वप्न पूर्ण करणार!

Devendra Fadnavis : देशातील महिला पंतप्रधान मोदीचं ‘४०० पार’चं स्वप्न पूर्ण करणार!

Devendra Fadnavis : देशातील महिला पंतप्रधान मोदीचं ‘४०० पार’चं स्वप्न पूर्ण करणार!

वर्ध्यात प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

वर्धा : मोदी सरकारने १० वर्षे केलेली विकास कामे म्हणजे ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’. देशातील महिला मोदींच्या ४०० पारच्या स्वप्नाला बळ देतील आणि देशाच्या विकासात आता खांद्याला खांदा लावून काम करतील. कारण येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत ३३ टक्के महिला खासदार आणि आमदार असतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वर्धेत महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांचे नामांकन दाखल केल्यानंतर स्वाध्याय मंदिरात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विदेशात देशाचे नावलौकिक केले आहे. पूर्वी त्यांची लाट होती आता त्सुनामी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लोकसभेत ४०० पारचा नारा दिला आहे.

गरीबांसोबत असलेल्या मोदींना ते या निवडणुकीत सहज शक्य आहे. त्यांनी राबविलेल्या गरीब कल्याणाच्या एजंड्यातून त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून गरीबांचा विकास केला आहे. २५ कोटी महिलांना त्यांनी आत्मनिर्भर केले. मोदींनी राबविलेल्या योजनांमुळे भारत पाचवी अर्थव्यवस्था झाली आहे. यातून आलेल्या पैशातून मोदी गरीब, आदिवासी, मागास समाजाचा विकास साधणारे आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी केवळ इंजन असलेली रेल्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुसाट असलेली विकास रेल्वे रोखण्याकरिता देशातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. यात असलेले नेते हे या रेल्वेचे इंजन आहेत. या रेल्वेत केवळ इंजन असून त्यात डब्बे नसल्याने ती कोणत्या दिशेने धावेल हे सांगणे कठीण आहे. उलट महायुतीच्या रेल्वेचे इंजन नरेंद्र मोदी आहे. या रेल्वेच्या डब्यात सर्वसामान्य बसलेले असल्याने ती रेल्वे विकासाच्या रुळावर धावणारी आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.