Home संपादकीय विशेष लेख भोगावती सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर

भोगावती सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर

भोगावती सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर

सेवाव्रती: शिबानी जोशी

आणीबाणीचा काळ हा लोकशाहीला लागलेला काळा डाग मानला जातो. या काळात अनेक संघ कार्यकर्त्यांना अटक झाली होती. कोल्हापुरातील देखील अनेक संघ कार्यकर्ते अटकेत होते. पुण्यातील येरवडा कारागृहात अटकेमुळे एकत्र आलेले कोल्हापूरमधील काही संघ कार्यकर्ते विविध विषयांवर चर्चा करीत असत. तसंच आपापल्या भागातील समस्यांचीही चर्चा होत असे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणाची सोय नसलेल्या दुर्गम भागातल्या मुलांसाठी काहीतरी सेवाकार्य उभे करण्याचे त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी ठरवलं. कारागृहातून सुटल्यावर कै. श्रीराम ठाकूर, कै. दिगंबर फडणीस, कै. दत्तात्रय पोतदार, कै. विठ्ठल पाटील, कै. रामचंद्र तेली या मंडळींनी भोगावती नदीजवळ असलेल्या कसबा तारळे इथे “भोगावती सांस्कृतिक मंडळ” ही संस्था सुरू केली आणि त्याद्वारे विद्यार्थी वसतिगृहाची १९७८ साली स्थापना केली. माध्यमिक शिक्षणासाठी दुर्गम गावांमधून दररोज दहा-बारा किलोमीटरचे अंतर मुलं चालून येत असत किंवा शिक्षण सोडून देत असत. अशा विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कसबा तारळे येथे मोफत निवास व्यवस्थाही उभी केली.

राधानगरी तालुक्यातील कसबे तारळे आणि दुर्गमानवाड या गावांच्या पंचक्रोशीमध्ये भोगावती सांस्कृतिक मंडळ गेली ४२ वर्षे कार्यरत आहे. हा भाग एकेकाळी वाहतूक आणि शिक्षणासारख्या मूलभूत सोयींपासून वंचित होता. मुलांसाठी निवासी शाळा चालवायची म्हणजे विश्वासू मनुष्यबळ लागते. ते कार्य उचललं कै. काका आठवले यांनी. बँक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झाल्यावर, पुण्यात राहणाऱ्या कै. पुरुषोत्तम शिवराम तथा काका आठवले यांनी सर्व शहरी सुखसोयी सोडून, विनावेतन पूर्णवेळ व्यवस्थापक म्हणून संस्थेतील जबाबदारी स्वीकारली. १९८० ते १९९५ या १५ वर्षांत प्रेमाने आणि परिश्रमाने त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं आणि संस्थेची प्रामाणिक, निरीच्छ, सेवाभावी अशी छाप उमटवली. त्यांचं निधन झाल्यानंतर आठवले यांचे नाव वसतिगृहाला देण्यात आले आहे. संस्थेतर्फे केवळ निवासाची सोय नाही, तर संपूर्ण दिवसभर मुलांना राष्ट्रप्रेम, राष्ट्र विचार, संस्कार, शारीरिक व्यायामाचे शिक्षणही दिले जाते.

पहाटे ५.३० पासून वसतिगृहाचा दिनक्रम सुरू होतो. सूर्यनमस्कार, प्रार्थना, अभ्यास, खेळ होतात. मनोरंजन, अभ्यासपूरक उपक्रम, सहल अशा सर्वच बाबींचा समावेश विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी केला गेला आहे. मान्यवर व्यक्ती, शैक्षणिक शंकानिरसनासाठी, ज्येष्ठ शिक्षक येथे नियमित येतात. कसबा तारळेच्या आसपास असणारे दुर्गम वाड्यावस्त्यांमधील गरजू व होतकरू विद्यार्थी या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. हे काम करत असताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, गावाच्या सर्वांगीण विकासाशिवाय नुसत्या मुलांच्या सोयींचा उपयोग नाही. यासाठी गावातल्या महिलांनासुद्धा प्रशिक्षित करून आपल्या पायावर उभं करणे गरजेचे आहे. त्यामुळे वसतिगृहाचे काम स्थिर झाल्यानंतर, भोगावती सांस्कृतिक मंडळाने, कसबा तारळे व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रमांकडे, कार्यक्रमांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. संस्थेतर्फे गावांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करणारे श्रद्धा जागरण कार्यक्रम सुरू झाले. संस्थेनं आयोजित केलेला दिंडी सोहळा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णाष्टमीमध्ये परिसरातील लोक उत्साहात सहभाग घेतात.

गावकरी आणि विद्यार्थ्यांसाठी काही सामाजिक उपक्रमदेखील सुरू आहेत. स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी व गुणीजनांचा सत्कार केला की, त्यांना प्रोत्साहन मिळते म्हणून गावातील अशांचा सत्कार, व्यवसाय मार्गदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे उपक्रमही परिसरात प्रसिद्ध आहेत. विज्ञान वाहिनी, पुणे या संस्थेच्या सहयोगाने विद्यार्थ्यांच्या विविध वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्या कार्यशाळेचे तसेच तणावमुक्त अभ्यासासाठी मनशक्ती केंद्रातर्फे कार्यशाळेचे आयोजन होत असते. काळाची गरज ओळखून तारळे पंचक्रोशीतील लोकांच्या गरजा व समस्या जाणून घेण्यासाठी २०२० मध्ये पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेतर्फे ९ ग्रामपंचायती व १५ वाड्यावस्त्यांचे Rapid Rural Appraisal (RRA)म्हणजे आवश्यकता पडताळणी सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार स्थानिक गरजा ओळखून काही ठोस योजना सुरू झाल्या.

निसर्गसंपन्न भाग असूनदेखील येथील गावकऱ्यांना पाण्यासाठी मात्र कष्ट उपसावे लागत होते. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सेवावार्धिनीतर्फे जलदूत उपक्रम उभा राहिला. डोंगर उतारावरील वाहते पाणी थांबून राहण्यासाठी वृक्षारोपणाचे कामही हाती घेतले. या परिसरात पडसाळी गावाजवळ एक देवराई आहे. या देवराईत अनेक प्रकारच्या वनस्पती तर आहेतच, शिवाय महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूचा अधिवासही आहे. येथे श्रमसंस्कार शिबिरांद्वारे पर्यावरण संरक्षण व देवराई संवर्धनाचा उपक्रम सुरू केला. आज या उपक्रमाला शासनाचेदेखील सहकार्य लाभत आहे.

दुर्गम भागातील गावकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, त्यांचे जीवनमान उंचावले जावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहराला गावाशी अधिक परिणामकारक रीतीने जोडण्याच्या उद्देशाने, ग्राममैत्रीअंतर्गत स्थानिक फळांची रोपे लावण्यात आली आहेत. त्यातून गावकऱ्यांना उत्पन्न मिळेल, अशी योजना आहे. शेती मार्गदर्शन, सेंद्रिय परसबाग मार्गदर्शन, ग्रामीण पर्यटन, तरुण शेती व्यावसायिकांसाठी अनेक उद्योगविषयक उपक्रमही राबवले जातात. तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनकल्याण समितीच्या सहकार्याने, घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती शिबीर घेतले जाते. यातून एखाद्याला गावातल्या गावात रोजगारही मिळू शकतो.

प्रवासी साधने आणि आरोग्य सुविधांचा अभाव या बाबी सुरुवातीपासूनच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जाणल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विषयातही संस्थेने काम सुरू केलं. त्यासाठी “डॉक्टर तुमच्या गावी” हा फिरत्या रुग्णालयाचा उपक्रम सुरू केला आहे. घरोघरी हिंडून फिरते डॉक्टर गावात आल्याचे सांगण्यापासून ते डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे, औषध देणे, आरोग्यविषयक सल्ले देणे, अशा सुविधा विनामूल्य पुरवल्या जातात. संस्थेचे सेवाभावी आणि प्रामाणिक काम पाहून आता गावकरीदेखील आनंदाने यात सहभाग नोंदवतात. गेल्या अडीच वर्षांत, १७ गावांमधील दोन हजार लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अशा विविध उपक्रमांमुळे कसबे तारळे आणि पंचक्रोशीतील गावकऱ्यांना भोगावती सांस्कृतिक मंडळ मोठा आधारस्तंभ वाटतो.

संस्थेची यापुढे जाऊन आता दोन-तीन मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. आपल्या अनेक संकल्पित उपक्रमांना मूर्त रूप देण्यासाठी संस्थेनं दुर्गमानगड इथं स्वतःची अडीच एकर जागा घेतली आहे. परिसरातील १० गावांमधील महिलांसाठी कृषी प्रक्रिया आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन, तसेच उत्पादनांच्या विक्रीसाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारले जाणार आहे.

नाचणी, वरी, जांभूळ, फणस प्रक्रिया केंद्र, स्थानिक कृषी मालापासून बिस्किटे, बेबी फूड, पापड, सत्त्व, सरबत, चूर्ण, जाम इत्यादी पदार्थांच्या निर्मिती व पॅकिंगचे प्रशिक्षण, विक्री व्यवस्थेसाठी तसेच विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे, असे कार्यक्रम येथे घेण्याची योजना आहे. याशिवाय इथे विविध स्तरातील लोक भेट द्यायला येतात. यासाठी किमान ३० व्यक्तींच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठी अतिथी कक्ष आणि भोजनगृहाची व्यवस्था येथे असणार आहे. अद्ययावत क्रीडा व कृषी प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. यात महिला प्रशिक्षण, विद्यार्थी निवास यांच्या आवश्यकतेसाठी असे १००० स्क्वेअर फुटांचे बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय ज्यामध्ये विविध विषयांवरील ५०० पेक्षा अधिक पुस्तकं असतील आणि रीडिंग रूम, रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, ओपीडी, विविध संस्थांच्या सहकार्याने भरवण्यात येणारी आरोग्य शिबिरे यांकरिता लागणारे वैद्यकीय सुविधा केंद्रदेखील बांधले जात आहे.

क्रीडा स्पर्धा, उन्हाळी व दिवाळी सुट्टीकाळात कबड्डी, खो-खो असे भारतीय खेळ, योग प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, पोलीस भरती, सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन वर्ग भरवणे इत्यादी उपक्रमांसाठी अद्ययावत असे क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची योजना आहे. संस्थेच्या वाटचालीत अनेक समविचारी संस्था, रोटरी क्लब, मोरया हॉस्पिटल, इचलकरंजीचे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, लोणावळ्याचं मनशक्ती प्रयोग केंद्र, शिवाजी विद्यापीठ, पुण्याची सेवावर्धिनी, सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सितारा, आयआयटी मुंबई, रा.स्व.संघ-जनकल्याण समिती अशा अनेक संस्थांचे सहकार्य मिळत असते.

१९७८ मध्ये काही ध्येयनिष्ठ मंडळींनी सुरू केलेलं कार्य त्या भागातील आबाल-वृद्धांचा विचार करून विविध क्षेत्रात काम करीत आहे. या पंचक्रोशीचा सर्वांगीण संस्कार पूर्ण विकास होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. संस्थेची मुख्य त्रिसूत्री आहे शिक्षण, ग्रामविकास, आणि आरोग्य. या त्रिसूत्रीसाठी सेवाभाव, ध्यास, सत्कृती, प्रामाणिकपणा, निरलस वृत्ती यामुळे दुर्गम भागातील लोकांमध्ये विश्वास निर्माण करून गेली. राज्यातल्या प्रत्येक दुर्गम भागात अशी एखादी संस्था निर्माण झाली, तर प्रत्येक दुर्गम भाग सुगम होईल, यात शंकाच नाही. भोगावती मंडळ हे त्याचं आदर्श उदाहरण म्हणता येईल.
joshishibani@yahoo. com