Home ताज्या घडामोडी दारूड्या बायकोच्या व्यसनाला कंटाळून पतीची आत्महत्या

दारूड्या बायकोच्या व्यसनाला कंटाळून पतीची आत्महत्या

दारूड्या बायकोच्या व्यसनाला कंटाळून पतीची आत्महत्या

देहू : दारुडा नवरा नेहमी पत्नीकडे पैशांची वारंवार मागणी करतो आणि पैसे न दिल्यास पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथे दारूड्या बायकोच्या व्यसनाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

देहूरोड पोलिसांनी पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. त्याचा भाऊ ज्ञानेश्वर (३९, रा. सोमठाणा, ता. मानवत, जि. परभणी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

नारायण निर्वळ हे अॅनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिची बहीण यांनी नारायण यांच्याकडे दारू पिण्यासाठी नेहमी पैशांची मागणी करत असत. तसेच पैसे न दिल्यास नारायण याच्याशी वारंवार भांडणे करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून नारायण यांनी १७ जानेवारी रोजी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.

दरम्यान, नारायण यांनी मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याबाबत मोठा भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी नारायणची पत्नी आणि तिची बहीण या दोघींना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.