राज्यात १ डिसेंबरपासून शांततेत साखळी उपोषण आंदोलन करण्याचे जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
धनगर, मुस्लीम आणि मराठा समाजाचे दुखणे एकच
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला असून जरांगे पाटील बुधवारपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी एकीकडे १ डिसेंबरपासून सर्वांनी साखळी उपोषण करण्यासाठी मराठा समाजाला आवाहन केले आहे. राज्यभरात सर्वांनी शांततेत आंदोलन करा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तर आता दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला लोकांना जर तुम्ही नेत्यांच्या घरी फराळासाठी जाणार असाल तर तुम्ही त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं याचा आधी जाब विचारा, असे ठणकावून सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील मराठा समाजाने जीवंत राहूनच लढले पाहिजे. गोरगरिब मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढा. कुणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा, आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाने साखळी उपोषण ताकदीने उभा राहिले पाहिजे. १ डिसेंबरला सर्वांनी साखळी उपोषण करा. तसेच जर तुम्ही नेत्यांच्या घरी फराळासाठी जाणार असाल तर तुम्ही त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं हे विचारा, असेही जरांगे पाटील म्हणाले.
“तुम्ही आजपासून मराठा समाजासाठी समाजाच्या पाठीमागे उभे रहा, असे नेत्यांना सांगा. तुम्ही पक्षाला, नेत्याला मोठे करण्यासाठी आपल्या पोरांचे वाटोळे करुन घेऊ नका. नेत्यांच्या फराळाला जाऊच नका, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, त्यांच्यातील नेत्यांच्या विरोधात आहोत, समाजाच्या विरोधात नाही, असा खूलासाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर, धनगर, मुसलमान आणि मराठा समाजाचे एकच दुखणे आहे. या समाजाच्या लोकांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावे, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ छ. संभाजीनगरमध्ये येणार आहे. याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र, दोन-तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यग्र असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र, मुद्दामहून जर टाळाटाळ होत असेल, तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.