Home ताज्या घडामोडी पीठ द्या, पीठ! पाकिस्तानात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे महिला बेशुद्ध तर अनेक जखमी

पीठ द्या, पीठ! पाकिस्तानात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे महिला बेशुद्ध तर अनेक जखमी

पीठ द्या, पीठ! पाकिस्तानात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे महिला बेशुद्ध तर अनेक जखमी

लाहोर: पाकिस्तानात मोफत मिळणाऱ्या पिठासाठी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एक महिला बेशुद्ध झाली असून अनेकजण जखमी झाले आहेत. महागाईने त्रस्त असलेले पाकिस्तानमधील नागरिक रमजानच्या काळात मोफत वाटल्या जाणाऱ्या पिठासाठी काहीही करायला तयार आहेत. दरम्यान, नियोजनाच्या अभावामुळे संतप्त नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे समजते.
रमजानच्या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ सरकार महागाईने त्रस्त असलेल्या गरीब नागरिकांना मर्दान येथील क्रीडा संकुलात मोफत पीठ वाटप करत होते. या पिठाचे वाटप सुरू असताना खैबर पख्तुनख्वामध्ये चेंगराचेंगरी झाली. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांना तासनतास रांगेत उभे केल्याने संतप्त लोकांनी आंदोलन करत नौशेरा रोड अडवला. आंदोलनादरम्यान पोलिसांवर आणि क्रीडा संकुलाच्या गेटवर दगडफेक करण्यात आली.

पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार केला, यात अनेक पाकिस्तानी जखमी झाले. या घटनेत अनेक महिला आणि वृद्धही बेशुद्ध झाले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज पिठाची चोरी होत आहे. गरीबांसाठी उपलब्ध करण्यात आलेले पीठ बनावट स्लिप देऊन बाजारात चढ्या भावाने विकले जात आहेत.

पाकिस्तानमध्ये मोफत आणि अनुदानित पिठाच्या वितरणादरम्यान यापूर्वीही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रमजानच्या काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की रमजान महिन्यात सुमारे १.५८ कोटी कुटुंबांना मोफत गव्हाचे पीठ दिले जाईल. त्यासाठी पाकिस्तानमध्ये वीस हजार अतिरिक्त वितरण केंद्रेही उघडण्यात आली आहेत.