Home महत्वाची बातमी कसबा आणि चिंचवडचा धडा

कसबा आणि चिंचवडचा धडा

कसबा आणि चिंचवडचा धडा
  • स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

ईशान्य भारतात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने देदीप्यमान यश संपादन केले. तिन्ही राज्यांत भाजप सत्तेवर असणार, हे निकालानंतर स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देशभर कायम आहे आणि त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयातील जनतेनेही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. पण त्याच वेळी महाराष्ट्रात झालेल्या चिंचवड आणि कसबा या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकींच्या निकालाने भाजपला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून लक्ष्मण जगताप व कसबामधून मुक्ता टिळक हे भाजपचे आमदार विजयी झाले होते. या दोघांचे आजारपणामुळे निधन झाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत पोटनिवडणूक झाली. केंद्रात भाजपची सत्ता आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर भाजपची सत्ता आहे, मग विजय आपलाच आहे, अशा भ्रमात भाजपचे राज्य पातळीवरील नेते राहिले. मोदींच्या नावावर मते मिळतात. पण मोदी नसतील तर काय होते, त्याची चुणूक या पोटनिवडणुकीत दिसून आली.

चिंचवडमध्ये भाजपला विजय मिळाला. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना मतदारांनी आमदार म्हणून निवडून दिले. पण कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना मतदारांनी नाकारले व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना विधानसभेत आमदार म्हणून पाठवले. चिंचवड व कसबा दोन्ही जिंकणार, अशा समजुतीत भाजपचे नेते होते. पण गेली तीस वर्षे भाजपचा भक्कम बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघातच भाजपला पराभव पत्करावा लागला. भाजपने चिंचवडला मिळविलेल्या विजयापेक्षा कसब्यातील पराभवाचीच चर्चा जास्त झाली. पराभव का झाला, याचे आम्ही आत्मपरीक्षण करू, अशी ठोकळेबाज उत्तरे नेहमीच ऐकायला मिळतात, तेच यावेळी घडले. पण कसबा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्तेही यावेळी सांगत होते की, यावेळी काही खरे नाही…. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक निमूटपणे निवडणुकीत भाजपचे काम करीत असतात. संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवकच आता मुंबई व दिल्लीत सत्तेवर आहेत. तरीही कसब्यात संघ स्वयंसेवकांनी मनापासून काम केले का? सत्तेवर आहोत म्हणून आपण सांगू तसेच घडणार, अशा भ्रमात अनेकजण वागत होते. त्यामुळे जनमानस काय आहे, त्याचा सुगावा लागूनही भाजपच्या वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही.

पुण्यातील कसबा मतदारसंघातील पराभव मोदी व शहा यांना मुळीच आवडणार नाही. ते पक्ष संघटनेसाठी अहोरात्र राबत आहेत, त्यांच्या परिश्रमामुळेच आज देशातील सोळा राज्यांत भाजपचे सरकार आहे, मग महाराष्ट्रात भाजप सत्तेवर असून तीस वर्षे ताब्यात असलेला मतदारसंघ का गमवावा लागतो? एक बरे झाले की, पोटनिवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएम मशीनचा घोटाळा अशी प्रतिक्रिया कुठे ऐकायला मिळाली नाही. कसबा मतदारसंघात काँग्रेस जिंकली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा ठाकरे गटाला जास्त आनंद झालेला दिसला. तो आनंद काँग्रेसच्या विजयाचा नव्हता, तर भाजपचा पराभव झाला म्हणून होता. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत सांगायचे, तर दुसऱ्याला मूल झाले म्हणून आपण पेढे वाटायचे, असा तो प्रकार होता. चिंचवड व कसबा येथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा कुठेच उमेदवार नव्हता म्हणून त्यांच्या पक्षाचे नेते कसब्यातला विजय महाआघाडीचा विजय म्हणून सांगत होते. पोटनिवडणुकीतील प्रचारात ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागे कसा फरफटत जातो हेच बघायला मिळाले.

कोण हे धंगेकर?, असा प्रश्न भाजपच्या एका मंत्र्याने जाहीरपणे प्रचारात विचारला होता. शेवटच्या दोन दिवसांत धंगेकर स्वर्गातून म. गांधींना स्वर्गातून प्रचारासाठी खाली घेऊन येतील, असेही कोणीतरी बरळले होते. त्याचे उत्तर मतदारांनीच या निवडणुकीत दिले. धंगेकर हे काही मूळचे काँग्रेसी नाहीत. त्यांचा प्रवास शिवसेना (ठाकरे), मनसे व नंतर काँग्रेस असा झालेला आहे. खरे म्हणजे धंगेकर व रासने हे दोन्ही उत्तम उमेदवार होते. पण धंगेकरांची कामाची तडफ व लोकप्रियता ही त्यांची जमेची बाजू होती. चिंचवडमध्ये जगतापांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली, मग कसब्यात मुक्ता टिळक यांच्या पतीला उमेदवारी का दिली नाही? पण त्याची कारणे पक्षाने किंवा नेत्यांनी कधीच सांगितली नाहीत. म्हणूनच निकालानंतर सोशल मीडियावर, टिळकच असंतोषाचे जनक… अशा पोस्ट व्हायरल होत होत्या. या अगोदर कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होताच, नंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नागपूर व अमरावतीतही भाजपला पराभव पत्करावा लागला, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपने शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि आता कसब्यात भाजपला मान खाली घालावी लागली. या सर्व पराभवांना जबाबदार कोण? कोकणातील जनतेने यापूर्वी ठाकरे यांच्या पक्षाला नेहमीच झुकते माप दिले. पण कोकणाची विधान परिषदेची जागा यावेळी भाजपला मिळाली, मग अन्यत्र पाठोपाठ पराभव का होत आहेत? या सर्व निकालांचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काहीच परिणाम होणार नाही का?

कसबा या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला गुलाल उधाळायला संधी मिळाली, हीच भाजपवर मोठी नामुष्की आहे. गिरीश बापट हे भाजपचे पुण्याचे खासदार आहेत. ते पाच वेळा कसब्यातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्यानंतर मुक्ता टिळक या आमदार झाल्या. बापट आजारी आहेत व घरीच आहेत. पण त्यांना तोंडाला ऑक्सिजनच्या नळ्या लावलेल्या अवस्थेत भाजपने प्रचारासाठी का बाहेर आणले? त्यातून काय साध्य झाले? मुक्ता व लक्ष्मण जगतापानांही ते आजारी असताना विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पक्षाने त्यांना रुग्णवाहिकेतून विधान भवनात मतदानासाठी आणले होते, त्याची गरज होती का?

गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात तेथील लोकप्रिय माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांनी त्या मतदारसंघावर दावा केला व तेथून आमदार झाले, तेव्हापासून पुणेकर भाजपप्रेमींमध्ये खदखद आहे, याचा भाजपश्रेष्ठींना विसर पडला असावा. अगोदर टिळक कुटुंबातील कोणाला तिकीट नाही, नंतर दुसरा कोणी ब्राह्मण उमेदवार नाही, याचीच चर्चा जास्त झाली. त्याचा रागही कसब्यात निघाला. धंगेकरांमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह होता. पण दुसरीकडे मतदारांची नाराजी व पक्ष कार्यकर्त्यांचा निरुत्साह भाजपला भोवला.

काँग्रेसने कसब्याची जागा जिंकली म्हणून भाजप-शिवसेना सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. काँग्रेसच्या आमदारांची संख्या एकने वाढेल इतकेच. पण चिंचवडमध्ये एका महिलेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला, हे पक्षाला मोठे नामुष्कीचे आहे. एका महिलेने राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांची जागा दाखवून दिली. चिंचवडची जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. पिंपरी-चिंचवडचा विकास आम्हीच घडवला, असे नेहमी राष्ट्रवादीचे नेते अभिमानाने सांगत असतात. कसब्यात भाजपचा पराभव झाला, आता देशभर होणार, असे ठाकरे गटाचे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते ओरडून ओरडून सांगत आहेत. पण ईशान्येकडील राज्यात काँग्रेसचे पानीपत झाले, त्याविषयी कोणी ‘ब्र’ काढत नाहीत.

मनसेने पोटनिवडणुकीत कसब्यात भाजपला पाठिंबा दिला होता. पण असंख्य मनसैनिक हे धंगेकरांसाठी काम करताना दिसले. पुण्यात भाजपचे शंभर नगरसेवक आहेत. कसबा मतदारसंघात भाजपचे सोळा नगरसेवक आहेत. उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, सहा मंत्री पुण्यात तळ ठोकून होते, तरीही भाजपचा कसा पराभव होतो? शनिवार, नारायण, सदाशिव या ब्राह्मणी पेठांमध्येही काँग्रेसला मताधिक्य मिळाले, हे भाजपला धक्कादायक आहे.

कसब्यात राष्ट्रवादीने ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका घेतली होती. पण भाजपचा उमेदवार काँग्रेसकडून पराभूत होताच, त्यांचे नेते-प्रवक्ते टीव्ही, कॅमेरासमोर लगबगीने दिसू लागले. चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या बंडखोरीने भाजपचा विजय सोपा केला. मतदारांना गृहीत धरता कामा नये, हाच संदेश कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीने दिला.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in