Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यनिर्बंध शिथिल, पण भीती कायम

निर्बंध शिथिल, पण भीती कायम

@ महानगर : सीमा दाते

जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने अद्यापही मुंबईची पाठ सोडलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसू लागली की, मनात धस्स होतं. गेल्या काही महिन्यांतील मुंबईसह राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला की, लक्षात येईल कोरोना रुग्णसंख्याही कमी झाली होती. म्हणून राज्य सरकारने राज्यातील, तर महापालिकेने मुंबईतील निर्बंध शिथिल केले होते; मात्र आता पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्ण वाढतील की काय, ही भीती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबई महापालिकेनेही आपली नियमावली जाहीर केली होती. मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्याने, मैदाने, चौपाट्या, हॉटेल, धार्मिक स्थळे या सगळ्यांसाठी ती नियमावली आहे. गेले दीड वर्षे हे सगळं बंद होतं; मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हळूहळू सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले. लोकल प्रवासाला काही अंशी परवानगी दिल्यानंतर उद्याने, मैदाने चौपाट्या सामान्य नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या. कार्यालये सुरू झाली, मंदिरे खुली झाली. पुन्हा एकदा लोकांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या आणि म्हणूनच पुन्हा एकदा भीती वाढू लागली.

ज्या पद्धतीने कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे आणि लसीकरण वेगाने होत आहे, हे ध्यानी घेऊन मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वाटत नाही, असे सांगितले होते. मात्र असे असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती संपलेली नाही. राज्य आणि मुंबईतील निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाची भीती कायम आहे आणि म्हणून नागरिकांनी देखील गाफील राहून चालणार नाही, जबाबदारीनेच वागणं गरजेचं आहे.

मुंबईत सध्या २००च्याही आत गेलेली कोरोना रुग्णसंख्या ५०० पार जाताना दिसत आहे. दोन वेळा रुग्णसंख्येने ५००चा आकडा पार केला होता. त्यानंतर बुधवारी, दि. ६ ऑक्टोबर रोजी ६२९ इतकी रुग्णसंख्या मुबंईत होती; त्यामुळे पुन्हा एकदा भीती वाढली आहे. गेल्या महिन्यात नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा झाला. निर्बंधही पूर्णपणे शिथिल न करण्यात आल्याने कदाचित गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या वाढताना दिसली नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत चढ-उतार दिसू लागला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं, हे आव्हान पालिकेसमोर आहे.

नवरात्रोत्सवात मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मुंबईत देवीची स्थापना होते. हा नवरात्रोत्सव देखील नियमांचे पालन करत सुरू आहे. पालिकेने यावर्षी देखील या उत्सवासाठी कडक नियमावली जारी केली आहे. याच नियमावलीचं पालन करत उत्सव सुरू आहे. मंडळातील कार्यकर्ते देखील गर्दी होऊ नये, याची काळजी घेत आहेत. मात्र कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार लक्षात घेता, पुढील एक महिना हा काळजीचाच आहे.

दसरा, दिवाळी हे मोठे सण सध्या येऊ घातले आहेत. या सणांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील बाजारात गर्दी होऊ शकते किंवा सणानिमिताने लोक एकमेकांना भेटतात. यामुळे रुग्णसंख्या देखील वाढण्याची भीती आहे आणि म्हणूनच पालिकेने देखील याच पार्श्वभूमीवर कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पालिकेने २६०हून अधिक केंद्रं देखील सुरू ठेवली आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, नागरिकांना देखील आता काळजी घेणं गरजेचं आहे. पालिकेने जरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं असलं तरी, वाढती रुग्णसंख्या ही पालिकेसाठी देखील आव्हानात्मकच आहे. लसीकरण वेगाने सुरू असताना पालिकेने तिसऱ्या लाटेसंदर्भात पूर्वनियोजन देखील केले आहे. ऑक्सिजन, रुग्णालये, खाटा यांचा पुरवठा करून ठेवला आहे. पण पालिकेसोबतच आता मुंबईकरांनाही आपलं भान जपत सण साजरे करायचे आहेतच. मुंबईकरांना जबाबदारीने, पालिकेचे नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तरच तिसरी लाट आलीच, तर मुंबईकर तिलाही थोपवू शकतात.

seemadatte12@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -