Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजस्वा. सावरकरांच्या विचारांची प्रासंगिकता

स्वा. सावरकरांच्या विचारांची प्रासंगिकता

विशेष : रवींद्र माधव साठे

सावरकर यांची १४०वी जयंती अलीकडेच साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंती दिनी म्हणजेच दि. २८ मे रोजी दिल्लीत नव्या संसद भवनाचे झालेले उद्घाटन तसेच तेथील महाराष्ट्र सदनात प्रथमच महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून केलेले वंदन हे या वेळेच्या सावरकर जयंतीचे ठळक विशेष…

स्वा. सावरकरांबद्दल सध्या देशात उलट-सुलट चर्चा घडवून आणली जात आहे. विशेषकरून काँग्रेस पक्ष योजनाबद्ध रितीने सावरकरांच्या माफिनाम्यासंदर्भात त्यांची देशभर बदनामी करत आहे. वास्तविक लंडनमध्ये जाऊन ब्रिटिश साम्राज्यास सुरुंग लावणारे सावरकर ब्रिटिशांपुढे कधी झुकले नाहीत हे सर्वश्रुत आहे. हे माहीत असूनही केवळ सावरकरांच्या द्वेषापोटी या मंडळींनी अभियान चालवले आहे. पण या सावरकर विरोधी अभियानाचा एक लाभ मात्र निश्चित झाला तो असा की, यानिमित्ताने सावरकरांचे नाव संपूर्ण देशभर जनतेस कळू लागले. सावरकर हे व्यक्तित्व केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे आहे, हे लोकांना ज्ञात होऊ लागले, ही एक समाधानाची बाब आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वीर सावरकरांचे स्थान अग्रणी आहे. ते ऐतिहासिक महापुरुष होते. महान क्रांतिकारक, कवी, लेखक, ओजस्वी वक्ता, नाटककार, सामाजिक सुधारक, अभिजात देशभक्त, द्रष्टे अशी कितीतरी विशेषणे सावरकरांना लावता येतील. भगूर-नाशिक येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. लोकमान्य टिळक हे त्यांच्या गुरुस्थानी होते. टिळकांच्या खांद्यावर आपण उभे आहोत त्यामुळे मला नेहमी पुढचे दिसते, असे सावरकर नेहमी म्हणत.

नाशिकमध्ये त्यांनी सन १९०० मध्ये ‘मित्रमेळ्याची’ स्थापना केली. लहानपणापासूनच देशभक्तीची शिकवण मिळून तरुणांना मरणाचे बाळकडू पाजणे अशा उद्दे‌शाने त्यांनी या संघटनेची स्थापना केली. चाफेकर बंधूंनी रँडला मारल्यानंतर चाफेकर बंधूंनी जे हौतात्म्य पत्करले, त्याने सावरकरांच्या जीवनास प्रेरणा मिळाली. अष्टभुजा देवीसमोर प्रार्थना करून ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ ही त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि तसे ते जीवन जगले. ब्रिटिशांच्या दास्यातून मातृभूमीस मुक्त करणे, हे त्यांच्या जीवनाचे इप्सित ध्येय होते. स्वा. सावरकर हे लहानपणापासून एकसंध व्यक्तिमत्त्व होते.

काँग्रेसने १९३० मध्ये लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती; परंतु त्याच्या कितीतरी वर्षे अगोदर सावरकरांनी नाशिकमध्ये विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय’ ही घोषणा देऊन निर्भेळ स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सावरकर पुण्यात गेले. लोकमान्यांचे त्यांना आकर्षण होतेच. त्यांच्या उपस्थितीत सावरकरांनी १९०५ मध्ये ब्रिटिशांविरुद्ध विदेशी कापडाची होळी केली. देशातील अशा प्रकारची ही पहिली होळी होती. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकार या मूल्यांची सर्वत्र चर्चा केली जाते; परंतु १९०३ मध्ये सावरकरांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य मानून स्वतंत्रता स्तोत्र रचले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हातात तिरंगा घेत भारतीय राज्यघटनेचा सन्मान करणारे सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व विरळच!

पुढे सावरकर बॅरिस्टर बनण्यासाठी लंडनला शिवाजी शिष्यवृत्तीअंतर्गत गेले. बॅरिस्टर हे केवळ निमित्त होते. खरा उद्देश ब्रिटिशांच्या राजधानीत जाऊन त्यास सुरुंग लावणे हाच होता. टिळकांच्या सूचनेनुसार लंडनमध्ये त्यावेळी शिकणाऱ्या प्रत्येक भारतीय मुलाशी संपर्क ठेऊन त्यांच्यात देशभक्ती जागविण्याचे काम सावरकरांनी केले. मदनलाल धिंग्रांसह अनेक युवकांना ब्रिटिशधार्जिण्या मनोवृत्तीकडून भारतधार्जिण्या मनोवृत्तीकडे त्यांनी वळवले. सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीचा मूलभूत पाया लंडनमध्ये घातला. स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, ही त्यांची धारणा होती. “रणावीणा स्वातंत्र्य कोणा मिळाले” असे ते म्हणत. त्यांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान निर्माण केले. मदनलाल धिंग्रांपासून सुभाषचंद्र बोसांपर्यंत क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. लंडनमधील आपल्या वास्तव्यात त्यांनी १८५७चे स्वातंत्र्यसमर, शिखांचा इतिहास ही पुस्तके लिहून भारतीय इतिहासाकडे बघण्याची एक व्यापक आणि योग्य दृष्टी दिली. याचबरोबर भारतातील क्रांतिकारकांना लंडनहून पिस्तुले पाठविणे, बॉम्ब तयार करण्याची विद्या, मॅडम कामा यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रेरित करणे, अमेरिकन नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, मराठी वाचकांसाठी लंडनहून बातमीपत्रे लिहून पाठविणे असे नाना प्रकारचे उद्योग सावरकरांनी केले.

सावरकरांनी जशी बुद्धिदेवतेची पूजा तशीच शक्ती देवतेचीही पूजा केली म्हणूनच त्यांनी बालपणी पांडवांपैकी भीमास प्राधान्य दिले होते. मार्सेलीस येथे फ्रान्सचा किनारा गाठण्यासाठी त्यांनी बोटीतून मारलेली उडी हा जगातील सर्वोच्च पराक्रम होता. पुढे अंदमानच्या कालकोठडीत त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. अंद‌मानच्या यातना हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वोच्च त्याग होता. अंद‌मानमध्येही त्यांनी सहकाऱ्यांमध्ये साक्षरता, वाचन संस्कृती, धर्मांतर विरोध, परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी शुद्धी चळवळ, कैद्यांना आत्महत्येपासून रोखणे इत्यादी महत्त्वाची कार्ये केली.

१९२४-३७ हा काळ त्यांचा रत्नागिरीतील स्थानबद्धतेचा होता. तिथे राजकीय कार्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले; परंतु ते स्वस्थ बसले नाहीत. या काळात सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहून हिंदुत्वास एक तार्किक भूमिका दिली आणि त्याचे तत्त्वज्ञान निर्माण केले. याचबरोबर सामाजिक सुधारणांचे क्रांतिकार्य केले. हिंदू समाजातील अंधश्रद्धांवर प्रहार केले. भ्रामक समजूत प्रामाण्याच्या विरोधात बंडखोरी केली. ते म्हणत की, ‘देव सज्जनांचे रक्षण करतो ही समजूत खरी असेल, तर त्याने पृथ्वीराज चौहान आणि रामदेवराय या सज्जनांचे रक्षण का नाही केले? महम्मद घोरी आणि अलाउद्दिन खिलजी यांच्याच गळ्यात विजयश्रीची माळ का घातली?’

हिंदू समाजातील जातीयतेवर त्यांनी कठोर प्रहार केले. अस्पृश्यता ही विकृती शस्त्रक्रियेने उपटून टाकल्यावर हिंदू समाजपुरुषाची प्रकृती निरोगी होईल, असे ते म्हणत. हिंदू समाज त्या काळी वेद बंदी, व्यवसाय बंदी, रोटी बंदी, स्पर्श बंदी, बेटी बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी या सप्तशृंखलेत अडकून पडला होता. या सप्तशृंखला शीघ्रगतीने गळून पडल्या पाहिजेत, यासाठी सावरकरांनी हिंदू समाजास आवाहन केले. ‘एक देव – एक देश – एक आशा – एक जाती – एक जीव – एक भाषा’ हे सूत्र त्यांनी सर्वांसमोर ठेवले. वयाच्या २०व्या वर्षी विधवांच्या दुःखावर त्यांनी कविता लिहून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता. हिंदू समाज एकसंध आणि सामर्थ्यशाली होण्यासाठी काय सुधारणा करता येतील, याचा कायम त्यांनी विचार केला.

रत्नागिरी पर्वात त्यांनी पतितपावन मंदिर निर्मिती, सर्व जातींना बरोबर घेऊन मंदिर प्रवेश, सहभोजन, महिलांसाठी हळदीकुंकवाचे दलित वस्त्यांमधून कार्यक्रम, सार्वजनिक सत्यनारायण पूजा, भाषाशुद्धी, व्याख्याने, लोकप्रबोधन इ. क्रांतिकार्य केले. ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यांचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य पाहून रत्नागिरी प्रवासात आलेले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अत्यंत खूश होऊन म्हणाले की, “परमेश्वराने माझे उर्वरित आयुष्य सावरकरांना त्यांच्या कार्यासाठी द्यावे”. कालबाह्य रूढी आणि परंपरांवर प्रहार, विज्ञान-निष्ठा आणि विवेकवादाचा पुरस्कार आणि प्रयत्नवादाचा प्रचार ही सावरकरांची सूत्री होती. मनुष्याच्या अंगभूत मूल्यास साद घालत स्वातंत्र्याचा रचनात्मक आनंद काय असू शकतो, याची अनुभूती दलित समाजास मिळणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांचे प्रतिपादन असे.

रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी देशभर झंझावती प्रवास केला. हिंदू महासभेची स्थापना केली. राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे, असा आग्रह धरला. सैन्यदलात हिंदू युवकांची भरती हे सावरकरांचे मोठे योगदान आहे. “स्वातंत्र्य लक्ष्मी की जय” आणि “हिंदुस्थान हिंदुओंका, नहीं किसीके बापका” या घोषणा देऊन दोन वेळा राष्ट्राची विचारक्रांती आणि आचारक्रांती घडवून आणली. उभ्या राष्ट्राचा जीवनप्रवाह प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे उलटवला.

स्वा. सावरकर द्रष्टे होते. त्यांनी मुस्लीम मानसिकतेचा अभ्यास केला होता. १९४२चे ‘चले जाव’ आंदोलन हे भारताला विभाजनाकडे नेईल हे त्यांनी ओळखले होते. Quit India movement will turn into Split India movement असे भाकीत त्यांनी वर्तविले होते. १९४७ मध्ये आपल्या देशाची शकले झाली आणि त्यांचे भविष्य खरे ठरले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ या संघटनेचा १९५२ मध्ये पुणे येथे सांगता समारंभ झाला. त्यात त्यांनी ‘आता बुलेट नव्हे, तर बॅलेटला महत्त्व’ असे सांगून लोकशाहीचा पुरस्कार केला.

स्वा. सावरकरांनी जे राजकीय आणि सामाजिक विचार सांगितले ते आजही प्रासंगिक आहेत. याची प्रचिती आपणांस येत आहे. २०१४ पासून भारतीय राजकारण आणि समाजकारणाचा पोत पूर्णपणे बदलला आहे. इतके दिवस वर्तुळाच्या परिघावर असणारे हिंदुत्व वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले आहे. हिंदू, हिंदुत्व या शब्दांना आणि हिंदू भावविश्वाला एक प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली आहे. सावरकरांनी हिंदू राष्ट्राची जी मीमांसा केली ती भारताच्या इतिहासात अद्वितीय ठरली आहे. त्यांनी हिंदू शब्दाला प्रतिष्ठा मिळवून दिली. हिंदू संकल्पना धार्मिक नसून ती सांस्कृतिक अधिक आहे हे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्र या संकल्पनेची सखोल चर्चा केली आणि भारतात हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहे हे तार्किकदृष्ट्या सिद्ध केले. हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांनी ‘दर डोई, एक मत’ असा प्रचार केला होता. हिंदू राष्ट्राच्या हिंदी राज्यात सर्वांना विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने समान अधिकार असतील आणि हिंदू राज्यव्यवस्थेत कोणावरही अन्याय होणार नाही ही त्यांची धारणा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ ही दिलेली घोषणा त्याचेच प्रतीक आहे.

भारत स्वतंत्र आणि सार्वभौम झाल्यानंतर तो भौतिकदृष्ट्या समर्थ आणि संरक्षण सिद्ध होणे हे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सावरकरांनी केले होते. त्यामुळे भारताने आपल्या सैन्यास अद्ययावत बनवावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती. यासाठी सीमांचे संरक्षण आधी करा, असा सल्ला पं. नेहरूंना त्यांनी दिला होता. विशेषत: चीनपासून भारताला धोका असून चीन पुढील काळात आक्रमण करू शकेल, असा इशारा स्वा. सावरकर आणि रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोन महापुरुषांनी पंतप्रधान नेहरूंनी दिला होता; परंतु पंडित नेहरूंनी ते फारसे गांभीर्याने घेतले नाही आणि पुढील इतिहास (१९६२ मधील चीनचे आक्रमण) आपल्यास विदित आहे. अंदमानला जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी जाताना सावरकर ज्या बोटीतून प्रवास करत होते, ती बोट जेव्हा पोर्ट ब्लेअरच्या जवळ आली त्यावेळी सावरकरांचे असे उद्गार आहेत की, “अंदमान हे भारताच्या नाविक दलाचे पूर्वेकडचे महाद्वार बनेल.” आज त्यांचे शब्द खरे ठरले असून भारताने तेथे नाविक दलाचा एक महत्त्वाचा तळ बसवला आहे. भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नौसेना, वायुसेना आणि स्थलसेना या सैन्य दलांच्या तीनही दलात अत्याधुनिक शस्त्रांच्या वसुविधांच्या साहाय्याने सिद्ध झाला आहे. सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. १९६२चा भारत आणि २०१४ नंतरचा भारत यांत जमीन-अस्मानचा फरक आहे. सावरकरांच्या विचारांना गती मिळू लागल्याचे हे द्योतक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. भारताची महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. काश्मीरचे ३७० कलम रद्द होणे, सुधारित नागरिकत्व विधेयक (कायदा) मंजूर होणे, अयोध्येतील भव्य
राम मंदिराच्या निर्मितीस चालना मिळणे, भारताच्या अंतर्गत सुरक्षेविषयी जागरूकता होणे, आत्मनिर्भर आणि समर्थ भारत बनण्याकडे नागरिकांची मानसिकता तयार होणे हा सावरकरी विचारांचाच विजय आहे.

२०१४ नंतर एक नवा भारत घडू लागला आहे. देशातील सर्व क्षेत्रांत हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदू समाजाचा विजिगिषू इतिहास याबद्दल जागरण होऊ लागले आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मता या सर्व क्षेत्रात स्वत्वाची आणि हिंदूंच्या भावविश्वाची जागृती होऊ लागली आहे. येथील राष्ट्रवादाला अधिक बळकटी द्यायची असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना आजही तरणोपाय नाही, हे यातून सिद्ध होते.

(सभापती, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, सचिव, सावरकर दर्शन प्रतिष्ठान)
ravisathe64@gmail. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -