Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीलोकांना विश्वासात घेऊन रिफायनरी होणारच

लोकांना विश्वासात घेऊन रिफायनरी होणारच

आ. नितेश राणे यांची स्पष्टोक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय बारसू येथील रिफायनरी प्रकल्प होणार नाही. बारसू किंवा नाणारचा भाग वगळून देवगड, राजापूर हे जे जुने प्रस्तावित भाग आहेत, तिथे सगळीकडे एकत्र म्हणून तो प्रकल्प येणार आहे.आजपर्यंत बारसू येथे फक्त सॉईल टेस्टिंग सुरू आहे. यानंतर प्रकल्प जागा निश्चिती होणार आहे. लोकांना विश्वासात घेऊनच सर्व काही होणार आहे. असे सांगताना आ. नितेश राणे यांनी जनतेने आंदोलन उभारण्यापर्यंत अजून तेवढा प्रकल्प काही सुरू झालेला नाही,असे मत व्यक्त केले.

कणकवली येथील नगरपंचायत कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारमधील सर्व प्रतिनिधींची भूमिका रिफायनरी बाबत स्पष्ट असल्याचे सांगितले.

रिफायनरी प्रकल्प केंद्र सरकारचा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील या प्रकल्पासंदर्भात चर्चा केली आहे. त्याचबरोबर संबंधित मंत्र्यांना देखील ते भेटलेले आहेत. त्यावेळी माजी आमदार प्रमोद जठार तसेच माजी खासदार निलेश राणे देखील होते. त्याही ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊनच केंद्र सरकार व राज्य सरकार रिफायनरी प्रकल्प राबवणार असल्याचे ठरले. त्यामुळे यात कोणाला आंदोलन करण्याची काही गरज भासणार नाही, असे स्पष्ट मत आ. नितेश राणे यांनी व्यक्त केले.

आता रिफायनरी होणारच!
पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, एका बाजूला राऊत आणि त्यांचे इतर काही लोक प्रकल्पाला विरोध करतात आणि दुसऱ्या बाजूला उदय सामंत यांच्याकडून खर्च मागतात? हे कसं होणार? असाही सवाल आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांना केला आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणाच्याही पोटावर लाथ मारून, कोणताही विरोध सहन करून काही होणार नाही. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच बारसू असेल, नाणार वगळून जो राजापूरचा भाग असेल आणि देवगडचा भाग या ठिकाणी सगळीकडे ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प होणार आणि त्याला थांबवण्याचे आता कोणामध्ये ताकत नाही, अशा प्रखर शब्दांत आमदार नितेश राणेंनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

स्वतःची किंमत वाढवण्यासाठी राऊत, नाईक यांचे प्रयत्न
जे विरोध करत आहेत विशेषतः खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक हे स्वतःची किंमत वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. खा. राऊत जे उदय सामंत यांच्यावर टीका करतात तेच विनायक राऊत दिवसातून किती वेळा उदय सामंत आणि किरण सामंत यांना फोन करतात? आणि काय काय बोलतात? याचा आता तपशील जाहीर करणार असल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले. जर विनायक राऊत यांना मी केलेले स्टेटमेंट जर खोटं वाटत असेल तर खासदार राऊतांनी आपल्या एका महिन्याचं कॉल रेकॉर्ड (रिपोर्ट) जाहीर करावा, असा थेट इशाराच आमदार नितेश राणे यांनी यावेळी खासदार राऊतांना दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -