Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीRandeep Hooda : घर विकलं, ३० किलो वजन कमी केलं... केवळ प्रोपागांडासाठी...

Randeep Hooda : घर विकलं, ३० किलो वजन कमी केलं… केवळ प्रोपागांडासाठी कुणी एवढं करतं का?

सावरकर सिनेमाला प्रोपागांडा म्हणणाऱ्या ट्रोलर्सना रणदीप हुडाचं सडेतोड उत्तर

मुंबई : मनोरंजनविश्वात प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडाचा (Randeep Hooda) आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी आतुरले आहेत, तर दुसरीकडे काहीजणांनी हा सिनेमा प्रोपागांडासाठी (Propaganda) केला असल्याचे म्हणत ट्रोल केले आहे. या सगळ्यावर रणदीप हुडाने स्वतः भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा चित्रपट बनवताना त्याने किती खस्ता खाल्ल्या याबद्दल सांगितले. तसेच दिवसरात्र आपण सावरकरांचाच विचार करायचो, असंही तो म्हणाला. या मुलाखतीत त्याने सिनेमाला प्रोपागांडा म्हणणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

रणदीप हुडा म्हणाला, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा प्रोपगंडा असल्याचं म्हटलं जात आहे. लोगों का काम है कहना.. पण सत्यपरिस्थिती मला माहिती आहे. मी हा सिनेमा रागात बनवला आहे. सावरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हा सिनेमा बनवला आहे. या सिनेमासाठी मला घर विकावं लागलं आहे. प्रोपागांडा सिनेमा बनवायला कोण एवढी मेहनत घेतं?”

रणदीप पुढे म्हणाला, “सावरकर माझ्या आयुष्यात आल्यापासून मी काळ्या पाण्याची शिक्षा भोगतो आहे. दोन वर्ष, दिवसरात्र मी त्यांचाच विचार करत आहे. अभिनेता म्हणून मी कमी लक्ष दिलं आहे. या सिनेमासाठी मी ३० किलो वजन कमी केलं आहे. हा प्रवास खडतर होता” असं तो म्हणाला.

वजन कमी करण्याबद्दल रणदीपने सांगितलं की, “माझी बहीण न्यूट्रिशन स्पेशालिस्ट आहे. तिने सांगितलेल्या गोष्टी मी फॉलो केल्या. १६ ते २० तास मी काही खात नसे. फक्त पाणी प्यायचो. ब्लॅक कॉफी, ग्रीन टी या गोष्टी खायचो. १६ तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही उपवास ठेवता तेव्हा तुमचं शरीर स्वत: ते रिपेअर करू लागतं. आठवड्यातून १-२ दिवस प्रत्येकाने उपवास ठेवायला हवा. त्यामुळे तुमचं शरीर रिसेट होईल. ऑमलेट, ड्रायफ्रूट या गोष्टी मी खात असे. एक चमचा नारळाचं तेळ, बदामाचं तूप आणि दोन काजू असा डाएट मी फॉलो केला आहे”, असं रणदीपने यावेळी सांगितलं.

सावरकरांचं कार्य जगभरात पोहोचवायचं आहे : रणदीप हुडा

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाबद्दल बोलताना रणदीप म्हणाला, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं व्यक्तिमत्त्व लार्जर दॅन लाईफ होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सिनेमा का बनवू नये? शाळेत असल्यापासून मला इतिहासाची आवड आहे. गणितापेक्षा इतिहास विषय जास्त आवडायचा. या सिनेमासाठी मला विचारणा झाली तेव्हा सगळ्यात आधी मी विचार केला की मी त्यांच्यासारखा दिसत नाही. वीर सावरकर आणि काळ्या पाण्याची शिक्षा यापलीकडे सावरकर मला माहिती नव्हते. पुढे मी त्यांच्याबद्दल वाचायला सुरुवात केली. प्रचंड रिसर्च केल्यानंतर सावरकर किती महान व्यक्तिमत्त्व आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी सावरकरांची गोष्ट महाराष्ट्राबाहेर का पोहोचली नाही? असा प्रश्न मला पडला. सावरकरांसोबत अन्याय झाल्याचं मला वाटलं. आता माझं कर्तव्य आहे की त्यांना न्याय मिळवून देणं. सावरकरांचं कार्य जगभरात पोहोचवायचं आहे”.

रणदीप पुढे म्हणाला, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कविता सर्वांनीच ऐकल्या आहेत. त्यामुळे सिनेमात त्यावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. आपल्याकडे प्रदर्शित होणारे बायोपिक देशभक्तीपर भाषण देणारे असतात. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमांसोबत जास्त जोडले जात नाहीत. पण या सिनेमात मी अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार कसे बदलत गेले, व्यक्तिमत्त्व कसे बदलत गेले हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात प्रेक्षकांना नाट्य, संगीत या गोष्टी भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळतील. जबाबदारीने मी हा सिनेमा बनवला असून अनेक गोष्टींवर आवाज उठवला आहे”, असं तो म्हणाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -