Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीराज ठाकरे VVIP तर उद्धव ठाकरे हे आयत्या बिळातले नागोबा!

राज ठाकरे VVIP तर उद्धव ठाकरे हे आयत्या बिळातले नागोबा!

राम मंदिरावरुन टीका करणा-या, टोमणे मारणा-यांना उद्घाटनासाठी बोलवण्याचे कारण काय?

महाराष्ट्र भाजपचा मोठा दावा

मुंबई : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाहीत पण राज ठाकरे (Raj Thackeray) असतील, असे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे नेहमी राम मंदिरावरुन टीका करतात. याआधी मंदिर वहीं बनायेंगे, मगर तारीख नहीं बतायेंगे, असे टोमणे मारायचे. त्यानंतर राम मंदिर उद्घाटनादरम्यान दंगली होतील, अशी आवई उठवली. कारसेवेत आम्हीच पुढे होतो, अशी सपशेल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती ते देत असतात. त्यामुळे अशा खोटारड्या, राम मंदिरावरुन टीका करणा-या, टोमणे मारणा-या उद्धव ठाकरेंना राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी बोलवण्याचे कारण काय?’ असा सवाल देखील गिरीश महाजनांनी केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले, केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोध्येच्या राम मंदिरावरुन आमच्यावर टीका केली त्यांना बोलवण्याचे कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा

गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. राज्याला आणि देशालाही माहिती आहे आम्ही कारसेवक जेलमध्ये होते. घरात बसून भूमिका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे. आम्ही २० दिवस जेलमध्ये होते. त्यावेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा.

मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी २० जानेवारीला मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघणार आहेत. गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही. त्याआधीच एक महिन्याच्या आत पर्मनंट आरक्षण मिळेल. जलद गतीने काम सुरु आहे. छगन भुजबळांना विनंती केली आहे की, आपापसांत भांडू नका. टीका करुन दोन समाजात तेढ निर्माण करु नका.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिले गेलेले नाही त्याच कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिले गेलेले नाही. कारण आमचे त्यांचे योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत. ज्यांचे काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे.

तेव्हा विश्वस्त समितीने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र अद्यापही पुढे काहीच हालचाल झालेली नाही. त्यातच महाजन यांनी केलेल्या या वक्तव्याने आता उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार की नाही, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -