Share
  • कथा : रमेश तांबे

“त्या मुलीला बक्षिसाची रक्कम अत्यंत गरजेची दिसते आहे. म्हणूनच ती जखमांचा विचार न करता जीवाच्या आकांताने धावते आहे.” काय करावे आणि काय करू नये असे द्वंद्व मीनाच्या मनात सुरू होते. सीमारेषा आता अधिक जवळ आली होती. धावता धावता मीना पायात पाय अडकून धडकन खाली पडली आणि काय घडले कुणालाच कळले नाही.

मीनाने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांच्या विभागातल्या जवळजवळ तीस शाळांमधले विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यांना भरपूर मोठे बक्षीस ठेवले होते. मीना तशी पट्टीची धावणारी. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तिने गाजवल्या होत्या. दरवर्षी ती या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवत होती. विशेष म्हणजे गेली दोन वर्षे मीना या स्पर्धेची अंतिम विजेती होती. म्हणून यावर्षी पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून आपण हॅटट्रिक साधायची, असा तिचा मानस होता.

स्पर्धेचा दिवस उजाडला. टी-शर्ट, ट्रॅकपॅन्ट, पांढरे शुभ्र किमती शूज घालून मीना मैदानात उतरली होती. मैदान मुलांनी खचाखच भरले होते. आपले वर्गमित्र-मैत्रिणी कुठे बसले आहेत याचा थांगपत्ता मीनालाही लागत नव्हता. एक एक फेरी जिंकत मीना अंतिम फेरीत पोहोचली होती. अंतिम फेरीसाठी आठ खेळाडूंची निवड झाली होती. मीनाचे हॅटट्रिकचे स्वप्न साकार होण्यासाठी आता काही मिनिटांचाच वेळ शिल्लक राहिला होता. तिने आपल्या सातही प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सहज नजर फिरविली. ही या शाळेतली, ती त्या शाळेतली आणि ती पलीकडची दिल्ली बोर्डातल्या शाळेची! सर्वच प्रतिस्पर्धी आपल्या ओळखीच्याच आहेत हे बघून मीनाचा आत्मविश्वास बळावला. नंतर तिची नजर सहजपणे शेवटच्या एका बुटक्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर पडली आणि अरेच्चा! ही कोण? तिने तर स्पर्धेचा ड्रेसकोडसुद्धा पाळला नाही आणि हे काय ती चक्क अनवाणी! बुटांशिवाय धावणार? अन् ही मला टक्कर देणार! मीना कुत्सितपणे तिच्याकडे बघत हसली. आता आपली हॅटट्रिक पूर्ण होणार याची मीनाला खात्री पटली आणि ती निश्चिंत झाली.

बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या आणि स्पर्धेला सुरुवात झाली. पंधराशे मीटर धावण्याची स्पर्धा होती. म्हणजे मैदानाला पाच फेऱ्या मारायच्या होत्या. मीनाने सुरुवातीपासूनच धावण्यात आघाडी घेतली होती. दोन फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. आता एक एक प्रतिस्पर्धी मागे पडत होता. मीनाने मागे वळून पाहिले तर ती बुटकी, अनवाणी धावणारी मुलगी तिच्या मागेच होती. आता चार फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. धावता धावता मीनाने खिशातली पाण्याची बाटली काढली. दोन घोट पाणी पिऊन तिने डोक्यावर थोडे पाणी ओतले. आता ती मुलगी मीनाच्या बरोबरीने धावू लागली. ती घामाने पूर्ण भिजून गेली होती. अचानक मीनाची नजर तिच्या पायांवर पडली आणि तिच्या काळजात धस्स झालं. कारण त्या मुलीच्या दोन्ही पायातून रक्त ओघळत होतं. पाय रक्ताने माखले होते. मीना विचारात पडली. अरे बापरे! एवढे कष्ट करून, एवढ्या वेदना सहन करून ती का पळते आहे? खरेच का तिला पैशांची एवढी गरज आहे? अजूनही मीनाला शर्यत जिंकण्याची खात्री होती. शेवटचा शंभर मीटरचा टप्पा होता. मीनाने जोर लावला. आता ती मुलगी मागे पडली. पण ती तिची धावण्याची आस काही कमी होत नव्हती. मीनाचं एक मन म्हणत होतं, “चल धाव मीना, आता काही सेकंदात तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे.” पण तिचं दुसरं मन म्हणत होतं, “त्या मुलीला बक्षिसाची रक्कम अत्यंत गरजेची दिसते आहे. म्हणूनच ती जखमांचा विचार न करता जीवाच्या आकांताने धावते आहे.” काय करावे आणि काय करू नये असे द्वंद्व मीनाच्या मनात सुरू होते. सीमारेषा आता अधिक जवळ आली होती आणि काय घडले कुणालाच कळले नाही. धावता धावता मीना पायात पाय अडकून धडकन खाली पडली. सारे प्रेक्षक एका जागी स्तब्ध उभे राहून घडलेला प्रकार बघू लागले. एका क्षणातच त्या बुटक्या, अनवाणी धावणाऱ्या मुलीने सीमारेषा पार केली. तिने स्पर्धा जिंकली! टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. इकडे मीना परत उठली आणि सहजपणे सीमारेषा पार करत तिने दुसरा क्रमांक पटकावला.

बक्षीस वितरणाच्या वेळी पहिल्या क्रमांकाचे दहा हजाराचे बक्षीस त्या बुटक्या, अनवाणी धावणाऱ्या मुलीने स्वीकारले आणि धावत जाऊन मीनाला मिठी मारली. तिच्या कानाजवळ तोंड नेत, “धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद!” अशी पुटपुटली. प्रथम येणाऱ्या मुलीने मीनाची गळाभेट का घेतली? इतक्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारी मीना ऐन मोक्याच्या क्षणी पायात पाय अडकून पडली कशी? शिवाय आपली हॅटट्रिक चुकल्याची, आपण अपयशी ठरल्याची कोणतीही निशाणी तिच्या चेहऱ्यावर कुणालाच दिसली नाही. याउलट तिचा चेहरा समाधानानं अधिकच उजळून निघाला होता. हे असे का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मात्र कधीच मिळाली नाही. ना मीनाने कधी कुणाला सांगितले!

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

14 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

15 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

15 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

16 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

16 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

16 hours ago