Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीसत्ता हातात द्या, सगळे टोल बंद करतो

सत्ता हातात द्या, सगळे टोल बंद करतो

महाराष्ट्रात जे काही चाललंय ती चांगली गोष्ट नाही

मुंबई : सत्ता हातात द्या, सगळे टोल बंद करतो, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले. सध्याच्या अस्थिर परिस्थितीकडे एक संधी म्हणून बघा म्हणत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला सुरवात केली. शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आज राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे तर मनसे आता स्थानिक पातळीपासून ते लोकसभेपर्यंतच्या तयारीला लागली असल्याचे चित्र आहे.

यावेळी त्यांनी सुरुवातीलाच शस्त्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती दिली. माझा शस्त्रक्रियेचा अनुभव खूप भयंकर होता. माझ्या शस्त्रकियेला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. कोरोनामुळे माझ्या हाडांचा आजार बळावला, असे त्यांनी मेळाव्यात स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले, मी उद्या पुण्याला जाणार आहे. याशिवाय, नाशिकला सुध्दा मी जाणार आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही बैठकांचे आयोजन करु नका, असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी पत्रकारांना देखील टोमणा लगावला. आज आपल्या पक्षाबाबत काही राजकीय पक्षांकडून अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे आपण सर्तक रहायला हवे. मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा चुकीचा आरोप आहे. आम्ही राज्यात ६५ ते ६७ टोलनाके बंद केले आहेत. मात्र, शिवसेना सत्तेत असताना त्यांनी काय केले. त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र असा उल्लेख केला होता त्याचे काय झाले? टोलचा पैसा जातो कुठे हा आपला मुळ प्रश्न होता. टोलबाबत कोणतीही उत्तरं सरकारकडून मिळाली नाहीत. सत्ता हातात द्या, सगळे टोल बंद करतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

ठाकरे पुढे म्हणाले की, पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार ९० टक्के भोंगे बंद झाले. बाकीच्या प्रार्थनाही आता कमी आवाजात ऐकायला येतात. आणि ह्या भोंग्यांबद्दलचे ते पत्र होते. मी हे पत्र फेसबुक, ट्विटर, व्हाॅटसअॅपवर टाकू शकलो असतो. पत्रकार परिषद घेऊनही ते पत्र दाखवू शकलो असतो. पण, मी हे पत्र तुमच्या हातात का दिले? मला पहायचे होते तुमचा आणि समाजाचा किती संपर्क आहे. तुम्ही लोकांपर्यंत कसे पाहोचता, लोकांकडे जाता की नाही जात. याबाबत काहींनी मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला. सगळे थंड झालेत. निवडणुकीचे वारे फक्त डोक्यामध्ये आहे. दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात जे काही चाललंय ती काही चांगली गोष्ट नाही. याआधी असे कधी झाले नव्हते. कोण कोणामध्ये मिसळलाय आणि कोण कोणासोबत गेला काहीत कळतं नाही, असे राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -