Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024राजस्थानविरुद्धचे शिखर पंजाबकडून सर

राजस्थानविरुद्धचे शिखर पंजाबकडून सर

अवघ्या ५ धावांनी किंग्जचा रोमहर्षक विजय

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार शिखर धवन यांच्या विस्फोटक सलामीमुळे पंजाब किंग्जने १९८ धावांचा डोंगर उभारला होता. नॅथन इलिसने गोलंदाजीत चमक दाखवत पंजाबचा विजय सोपाही केला. मात्र राजस्थान रॉयल्सच्या शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल या जोडीने शेवटच्या षटकांत आक्रमण केल्याने सामन्याने वळण घेतले. अखेर सॅम करनच्या निर्णायक अशा शेवटच्या षटकातील अचूक गोलंदाजीमुळे रोमहर्षक झालेला सामना आपल्या बाजूने फिरवण्यात पंजाबला यश आले. ५ धावांनी पंजाबने हा सामना खिशात घातला.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अडखळत झाली. राजस्थानने या सामन्यात सलामीवीर जोडीमध्ये प्रयोग केला. बटलर ऐवजी रविचंद्रन अश्विनला सलामीला आणण्याचा प्रयोग फसला. अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ यशस्वीही या सामन्यात अयशस्वी ठरला. त्याने अवघ्या ११ धावा केल्या. २६ धावांवर राजस्थानचे २ फलंदाज तंबूत परतले होते. पहिले दोन्ही विकेट अर्शदिप सिंगने मिळवून दिले. गत सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावणाऱ्या जोस बटलरने या सामन्यात विस्फोटक सुरुवात केली खरी पण त्यात त्याला सातत्य राखता आले नाही. इलिसने आपल्याच गोलंदाजीवर झेल पकडत पंजाबला मोठा बळी मिळवून दिला. कर्णधार संजू सॅमसनचा गत सामन्यातील फॉर्म याही सामन्यात कायम राहिला. त्याने अवघ्या २५ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावांची फटकेबाजी केली. इथेही इलिसच राजस्थानच्या मदतीला धावून आला. २१ धावा करणाऱ्या देवदत्त पडिक्कल आणि २० धावा जमवणाऱ्या रियान पराग यांनाही इलिसनेच माघारी धाडत पंजाबला मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर मात्र सामन्याने वळण घेतले. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी वादळी खेळी खेळत राजस्थानला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. शेवट जसजसा जवळ येत होता तसा सामना दोलायमान स्थितीत होता. अर्शदीपचे १९ वे षटक महागडे ठरल्याने सामन्याचा रोमांच वाढला. मात्र शेवटचे षटक स्टार गोलंदाज सॅम करनने अचूक टप्प्यावर टाकत सामना आपल्या बाजूने वळवला. राजस्थानने २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १९२ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले.

पंजाबच्या प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार शिखर धवन या सलामीवीरांच्या जोडगोळीच्या रुपाने तुफानच मैदानात आले होते. या जोडीने रॉयल्सच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत पंजाबसाठी ९० धावांची सलामी दिली. संघाची धावसंख्या ९० असताना प्रभसिमरन सिंगच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का बसला मात्र संघाला अपेक्षित सुरुवात करून देण्यात सलामीवीर यशस्वी ठरले. जेसन होल्डरने प्रभसिमरन सिंगचा अडथळा दूर केला. प्रभसिमरन सिंगने ६० धावा जमवल्या. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने फलंदाजीची सूत्रे हाती घेत राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने ५६ चेंडूंत नाबाद ८६ धावा फटकवल्या. या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. शिखरला जितेश शर्माने २७ धावांची साथ दिली. पंजाबने २० षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात १९७ धावा तडकावल्या. राजस्थानच्या जेसन होल्डरने २, तर अश्विन आणि चहल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. मात्र चहल खूपच महागडा ठरला. त्याला ४ षटकांत ५० धावा चोपल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -