Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीPune Development works : हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले...

Pune Development works : हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले जाणार

भूमीगत मेट्रो आणि रिंग रोडचे काम लवकरच सुरु होणार

पुण्यात विकासकामांच्या भूमीपूजनावेळी देवेंद्र फडणवीसांच्या घोषणा

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील (Pune Cantonment Assembly Constituency) विविध विकास कामांचे (Development works) भूमीपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. यावेळेस या नव्या विकास कामांबद्दल फडणवीस यांनी माहिती दिली. हिंजवडी आयटी पार्कमधील (Hinjvadi IT Park) मेट्रो स्टेशन (Metro station) स्काय बसने (SkyBus) जोडले जाणार आहेत. तसेच भूमीगत मेट्रो आणि रिंग रोडच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

या भूमीपूजनावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दिपील कांबळे, संजय काकडे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

‘पुण्यात मेट्रो मार्गाचा विस्तार असताना हिंजवडी आयटी पार्कमधील आस्थापने आणि मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना गाड्या वापरण्याची वेळ येणार नाही व प्रदूषण देखील कमी होईल. हा प्रयोग करण्यासाठी सर्व आवश्‍यक मान्यता मिळालेल्या असून, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची तारीख घेऊन भूमीपूजन केले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यात पुन्हा आमची सत्ता आल्यानंतर पुण्याच्या रिंग रोडच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच कामाला सुरू होईल. रिंग रोड मुळे एक लाख कोटींची गुंतवणूक पुण्यात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु

फडणवीस म्हणाले, पुणे हे देशातील प्रमुख शहरांपैकी एक असून, ही फ्युचर सिटी आहे. त्यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. पुण्यात मेट्रो मार्गांचे विस्तार होणार आहे. दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमीगत मेट्रोची नुकतीच यशस्वी चाचणी झाली आहे. लवकरच पुण्यात ५४ किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होईल. शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचे काम सुरु आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीत महापालिकेच्या योजनांचा लाभ

पुणे महापालिकेतर्फे आरोग्य योजनांसह इतर योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचा कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना लाभ दिला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुण्यात रेल्वेच्या जागांवर झोपडपट्ट्या झालेल्या आहेत. तेथे एसआरए राबवून नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल. कॅन्टोन्मेंट बोर्डाला जीएसटीच्या उत्पन्नातून वाटा मिळावा यासाठीही केंद्राकडे पाठपुरावा करू असे फडणवीस यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -