Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद

महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद

मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांबरोबरच १० टक्के अधिक अशा एकूण २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -