Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिक मनपा शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्याकडे सापडलं घबाड

नाशिक मनपा शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्याकडे सापडलं घबाड

५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना केली होती अटक

नाशिक : नाशिक महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करणाऱ्या सुनिता धनगर आणि लिपिक नितीन जोशी या दोघांना एसीबीने लाच घेताना अटक केली होती. ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना रंगे हाथ पकडले होते. अटक केल्यानंतर पथकाने सुनिता धनगर यांच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड पथकाच्या हाती लागले. एका शिक्षणाधिका-याच्या घरी एवढी रक्कम पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुनीता धनगर यांच्या घरावर छापा मारला. यावेळी छाप्यात तब्बल ८५ लाख रोख रक्कम आणि ३२ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्याचबरोबर धनगरांच्या नावावर २ आलिशान फ्लॅट्स आणि एक जागा देखील असल्याचे समोर आले. यातील एक फ्लॅट टिळकवाडीला असून दुसरा उंटवाडी येथे आहे तर आडगाव येथे प्लॉट आहे. उंटवाडी येथील त्यांच्या राहत्या ३ बीएचके फ्लॅटची किंमत दीड कोटींच्या घरात आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली.

लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरात जवळजवळ आठ तास एसीबी पथकाचा तपास सुरु होता. यातही चार ते पाच तास हे रक्कम मोजण्यात गेले. शेवटी रक्कम मोजण्यास अडचण येत असल्याने थेट मशीनच्या साहाय्याने ८५ लाख रुपयांची रोकड मोजण्यात आली. तरीदेखील अद्याप बँक खात्यासह इतर मालमत्ता तपासणी करणे सुरु असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले आहे.

५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले

या प्रकरणातील ५० वर्षीय तक्रारदार हे एका खाजगी शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. काही कारणास्तव त्यांना या पदावरुन बडतर्फ करण्यात आले होते. यासंबंधी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरणात दाद मागितली. निकाल मुख्याध्यापकांच्या बाजूने लागूनही संस्थेने त्यांना नियुक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकाने महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांच्याकडे तक्रार केली. याचे आदेश काढण्यासाठी धनगर यांनी ५० हजार आणि त्या कार्यालयातील लिपीक नितीन जोशी याने पाच हजार रुपये शिक्षकाकडे मागितले.

धनगरांच्या गैरप्रकाराच्या चर्चांना उधाण

सुनिता धनगर यांनी यापूर्वीही अनेक कामांमध्ये गैरप्रकार केल्याचे आरोप माहिती शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी करत आहेत. यामुळे अजूनही काही गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षापासून त्या नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत आहेत. यापूर्वी तीन वर्षे धनगर देवळा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -