Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वNarendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खादीच्या वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खादीच्या वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ

मुंबई : अलीकडच्या काळात खादीसंबंधित उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. परिणामी, ग्रामीण भागामधील कारागिरांनी बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीत मागील नऊ आर्थिक वर्षांमध्ये ३३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचा व्यवसाय सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांचा होता. २०२२-२३ मध्ये तोच व्यवसाय एक लाख चौतीस हजार ६३० कोटी रुपयांपर्यंत वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः खादी आणि संबंधित उत्पादनांचे मोठे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. खादीच्या प्रचारासाठी ते सातत्याने आग्रही असतात. परिणामी, ‘खादी ग्रामोद्योग विकास महामंडळा‘च्या उत्पादनांचा व्यवसाय प्रथमच एक लाख ३४ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाने ग्रामीण भागात नोकरीच्या नऊ लाख चोपन्न हजार ८९९ संधी निर्माण केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी देश-विदेशातील प्रत्येक व्यासपीठावरून खादीचा प्रचार केला. त्यामुळेच खादी आणि संबंधित उत्पादने लोकप्रियतेच्या नवीन शिखरावर पोहोचली, असे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार म्हणाले. जगातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये खादी उत्पादनांची गणना केली जाते. २०१३-१४ ते २०२२-२३ या नऊ आर्थिक वर्षांमध्ये खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीमध्ये ३३२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

यावरून, स्थानिक आणि स्वदेशी उत्पादनांसाठी आवाज उठवणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर असणारा नागरिकांचा विश्वास वाढल्याचे दिसून येते. परिणामी, २०१३-१४ या आर्थिक वर्षात खादी आणि संबंधित वस्तूंचे सुमारे २६ हजार कोटी रुपये असलेले उत्पादन २०२२-२३ या आर्थिक वर्षात २६८ टक्के वाढीसह ९५ हजार ९५७ कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या नऊ वर्षांमध्ये खादी कापडाच्या उत्पादनात २६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाकाळानंतर जगभरात सेंद्रिय कपड्यांची मागणी वाढली आहे. परिणामी, खादी कपड्याची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

बँकांमध्ये जमा झाल्या १.८० लाख कोटींच्या दोन हजारांच्या नोटा

भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर २३ मेपासून बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांमध्ये जमा झालेल्या नोटांची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली असून आतापर्यंत १.८० लाख कोटी मुल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

चलनात असणाऱ्या ५० टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. १९ मेपर्यंत ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. अपेक्षेनुसार दोन हजार रुपयांच्या ८५ टक्के नोटा थेट बँकेच्या खात्यात जमा केल्या जात आहेत. बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी कोणतीही घाई, गोंधळ सुरू नसल्याची माहिती दास यांनी दिली. दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठीचार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे यासाठी घाई करायची गरज नाही. रिझर्व्ह बँकेकडे चलनाचा पुरेसा साठा आहे. आपल्यापैकी अनेकांना अखेरच्या क्षणी काम करण्याची सवय असते; मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या दहा-पंधरा दिवसांमध्ये नोटा जमा करण्यासाठी गर्दी होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला. २०१६ मधील नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरेतर, त्याच वर्षी रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ च्या कलम २४(१) अंतर्गत दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या. मागील चार वर्षांमध्ये दोन हजार रुपयांची एकही नोट छापली गेली नाही. २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये दोन हजाराच्या सुमारे पस्तीस हजार कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर २०१७-१८ मध्ये फक्त एक हजार कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन २०१८-१९ मध्ये केवळ चारशे सहासष्ठ कोटी नोटा छापण्यात आल्या. २०१९ पासून २०२२ पर्यंत दोन हजार रुपयांची एकही नोट छापली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -