Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमालवणी बोलीचे जतन...

मालवणी बोलीचे जतन…

सतीश पाटणकर

भाषा म्हणजे संस्कृती, प्रवाह, अस्मिता. एखाद्या भाषेच्या बोलीभाषा जितक्या जास्त तेवढी ती भाषा ऐश्वर्यसंपन्न. कोणतीही बोली मूळ प्रमाणभाषेलाही समृद्ध करते. प्रमाणभाषेहून बोली या अधिक जिवंत आणि रसरशीत असतात.

महाराष्ट्रात एकूण ५२ बोलीभाषा आहेत. प्रत्येक भाषेचे प्रमाण किंवा ग्रांथिक व बोली असे दोन भाग आढळून येतात. मराठी, अहिराणी, आगर, खानदेशी लेवा, ५ – चंदगडी, झाडी, पोवारी, हळी, तावडी, मालवणी, वऱ्हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी. कातकरी, कोकणा, कोरकू, कोलामी, गोंडी, देहवाली, परधानी, पावरी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, मावची, मांगेली, वारली, हलबी, ठाकरी, ‘क’ ठाकूरी, ढोरकोळी, ‘म’ ठाकूरी, कुचकोरवी, कैकाडी, कोल्हाटी, गोरमाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, नंदीवाले, पारोशी मांग, पारधी, बेलदार, मांग गारुडी, वडारी, वैदू. इ. बोली भाषा आपल्याला निदान ऐकून तरी माहीत असतात. याचीही कल्पना असते की, या बोली भाषा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत व त्यांची नावे त्या त्या भागांवरून पडली आहेत. कोणतीही प्रमाण भाषा जिवंत राहते व समृद्ध होते ती त्या भाषेत कार्यरत असलेल्या बोलींमधूनच! बोली भाषा या कोणत्याही प्रमाण भाषेच्या मूल शक्तीस्त्रोतच असतात. बोलींमधला रांगडेपणा, भाषिक आदान-प्रदानातील संकेतार्थ, लवचिकता, अभिव्यक्तीतील उत्स्फूर्तता, साहजिकता, सूचकता अशा गुणधर्मांमुळे प्रमाणभाषेला खरा जिवंतपणा लाभत जातो. प्रमाणभाषेच्या विकासात प्रादेशिक बोलींना त्यामुळेच अधिक महत्त्व असते. मायबोली ‘मालवणी’नेही प्रमाण मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये असेच वैशिष्ट्यपूर्ण आगळे वेगळे योगदान दिले आहे.

मालवणी ही कोकण विभागातील  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागाची  बोली भाषा  आहे. ऐकण्यास मधुर अशी ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे. मालवणी म्हणून ओळखली जाणारी ही बोली मूळ कुडाळी किंवा कुडाळदेशकर भाषा आहे. या कुडाळ पट्ट्यातील मालवणीचा पहिला शब्दकोश शामकांत मोरे यांनी तयार केला आहे. भाषेचे क्षेत्र जिल्हा, प्रांतापुरते मर्यादित असते. त्यामुळे या भाषेला स्थानिक नाव मिळाले. दर १२ कोसांवर भाषा बदलते. या उक्तीनुसार कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, आचरे, बांदा परिसरांतील मालवणी रहिवासी यांची बोली थोडी वेगळी आहे. दर बारा मैलांवर भाषा बदलते, असं म्हटलं जातं. ही भाषा त्या प्रदेशातली ‘बोली’ असते. ती त्या भागातील भाषिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचा अंश असते. कारवारपासून गोमंतकासह रत्नागिरीपर्यंत कोकण प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीला पूर्वी ‘कोकणी’ असे म्हटले जात असे. मात्र गोवा राज्याच्या निर्मितीनंतर कारवार व गोवा प्रांतात बोलली जाणारी ‘कोकणी’ ही गोवा राज्याची स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता पावली. दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ‘मालवणी’ ही बोली कोकणीहून बऱ्याच अंशी भिन्न आहे.

कोणतीही भाषा ही मानवी समूहाच्या जगण्याचं चालीरिती-रुढींचं, प्रथा-परंपरांचं, श्रद्धांचं प्रतिबिंब वागवित असते. यातून त्या-त्या समाजाची संस्कृती प्रतिबिंबीत होत असते. या बाबी बदलल्या, लोप पावल्या की संस्कृती बदलते.

संस्कृती बदलली की, भाषा बदलते अर्थात ती एकदम बदलत नाही, हळूहळू नकळत बदलते. याच नियमानुसार बोलीभाषा ही दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत राहते. भाषेसोबत स्थानिक दगड, डोंगर, माळ, जमीन, पाणी, पिके, अन्न व धान्याच्या चवी या सगळ्यात काही वेगळेपण दिसत असते आणि त्याचा पुन्हा परिणाम भाषेवर नकळत होत असतो.

कर्नाटकात कानडी, तर गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात. केरळातील कोकणी लोक मल्याळी लिपी वापरतात व कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. गोव्यात कोकणी आणि मराठी या भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. कोकणी ही एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोकणी ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोकणी व हिंदूंची कोकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे. महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.

इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिणी भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे आणि तिच्यात थोडा हिंदीचा प्रभावसुद्धा आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत. दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ‘मालवणी’ ही बोली कोकणीहून बऱ्याच अंशी भिन्न आहे. मालवणीप्रमाणे संपूर्ण कोकणप्रांतात आणखीही अनेक भाषाभेद पाहावयास मिळतात. ग्रीयर्सन यांच्या भाषिक निरीक्षणानुसार या प्रदेशातील जवळजवळ तीसांहून अधिक बोली कोकणी म्हणाव्या लागतील. त्यात मालवणी ही एक वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे. दक्षिण कोकणातील दोडामार्ग सावंतवाडीपासून मालवण, देवगड, फोंडा, वैभववाडी ते राजापूर अशा अरबी समुद्राच्या किनारपट्टीचा प्रदेश आणि गोमंतकाचा सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतचा प्रदेशात ही बोली बोलली जाते.

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग या बोलीच्या प्रभावाखाली येतो. ‘मालवणी’ बोलीला भाषातज्ज्ञांनी ‘कुडाळी’ असे नाव दिले आहे. तथापि मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे या बोलीला ‘मालवणी’ असे म्हटले जाऊ लागले. या प्रदेशातील दैनंदिन जीवन व्यवहाराचे साधन म्हणून या बोलीचा वापर केला जातो. किंबहुना अनेक साहित्यिकांनीही कथा-कादंबरी आणि काव्य-नाटकांसाठीही या बोलीचा वापर केला आहे. अनुनासिक उच्चार हा मालवणीचा महत्त्वाचा विशेष होय. त्याचबरोबर हेल काढून बोलण्यात या भाषेचा खरा लहेजा असलेला दिसतो. गावरहाटीतील विविध देवतांना घातली जाणारी गाऱ्हाणी, म्हणी, वाक्प्रचार आणि लोकोक्ती यातून या बोलीचे सामर्थ्य प्रत्ययाला येते. अनेक लोककथा, विविध समाजांची लोकगीते आणि लोकनाट्ये मालवणी बोलीत असलेली दिसतात.

धाला, मिघा, देसरूढ (अशुभनिवारण विधी) यासारखे लोकविधी या बोलीतील लोकगीतांच्या आधाराने साजरे केले जातात. इथल्या कृषिसंस्कृतीचे दर्शन मालवणी बोलीतील अनेक लोकगीतांमधून प्रकट झालेले दिसते. ‘दशावतार’ या विधिनाट्यातील संकासूर या पात्राच्या मुखातील संवाद मालवणी बोलीतच असतात. इथल्या माणसांकडे असणारे संवादचातुर्य, कृतिउक्तीमधील तिरकसपणा संकासुराच्या भाषेतून प्रत्ययाला येतो. त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या प्रदेशातील सामान्य बहुजनांच्या जीवनाचे भाषिक अंगाने प्रतिनिधित्व करणारे हे पुराणातील पात्र इथल्या मानववंशाच्या इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरावे, असे आहे.

मालवणी बोलीत अधिक शिव्या असतात, असे म्हटले जाते. वास्तविक शिवी हा एक सहज भाषिक आविष्कार असल्यामुळे आणि बोलीरूप प्रमाणभाषेपेक्षा अधिक नैसर्गिक, रांगडे असल्यामुळे प्रत्येक बोलीतच शिव्या असतात. मात्र प्रत्येक वेळी शिवी क्रोध वा तिरस्कारापोटी येते असे नाही, तर ती प्रेमापोटीही येत असते. मालवणी बोलीही याला अपवाद नाही. मालवणी बोलीचे भूसांस्कृतिक वैशिष्ट्य असे की, ही बोली समाजाप्रमाणे आणि जातिसमूहांप्रमाणे विभिन्न रूपांत दैनंदिन जीवनात वापरली जाते. मालवणी निस्त्याकाची चव जशी मसाल्यामुळे जातींप्रमाणे वेगळी असते, तशी या भाषेतील अनेक शब्द आणि त्यांचे उच्चार जातिसमूहांप्रमाणे बदलतात. ब्राह्मणसमाज, सारस्वतसमाज, कोळीसमाज, कुळवाडी आणि दलितसमाज यांच्यातील मालवणी उच्चारात काहीशी भिन्नता असलेली जाणवते. जाताऽत, जाताहाऽत, जातासाऽत, जातांत असे एकाच शब्दाचे उच्चार होताना दिसतात.

कोकणातील मुस्लीम समाजात, तर मालवणी आणि हिंदीचे एक मिश्ररूप पाहावयास मिळते. मालवणी प्रदेशातून गेलेल्या आणि दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य करून राहिलेल्या मालवणी माणसांची बोली अशीच मिश्ररूपात ऐकावयास मिळते. आतापर्यंत मालवणी भाषेला प्रमाण मराठी भाषेसमोर दुय्यम स्थान दिले जात होते. मुंबईसारख्या शहरात वावरताना प्रमाण मराठी भाषेतच बोलणे हे मालवणी माणसाला कोणे एकेकाळी प्रतिष्ठित वाटायचे आणि दोन मालवणी माणसे एकत्र आली, तरी ती मराठीतच बोलायची. मात्र नटवर्य मच्छिंद्र कांबळी यांनी ‘वस्त्रहरण’ हे मालवणी नाटक रंगमंचावर आणले आणि त्या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवायला प्रारंभ केल्यावर मालवणी बोलणे हेच मालवणी माणसाला प्रतिष्ठेचे वाटू लागले. त्यानंतर मात्र ही मालवणी बोली टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्याचे दिसत नसतानाच आता थेट मुंबई विद्यापीठासारख्या राज्यातील अग्रगण्य विद्यापाठीने मालवणी साहित्याचा स्वतंत्र अभ्यासक्रमातच समावेश करीत मालवणी भाषेला विशेष गौरव व सन्मान प्राप्त करून दिला आहे.

‘वस्त्रहरण’पुरत्या मर्यादित राहिलेल्या मालवणी बोलीला सन्मान देऊन या मालवणी साहित्यावर संशोधन करता यावे व या साहित्याचा अधिक प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने प्रथमच आपल्या एसवायबीएच्या अभ्यासक्रमात मालवणी बोलीतील साहित्याचा समावेश करीत समस्त मालवणी बांधवांना सुखद धक्का दिला. एसवायबीएच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेल्या या साहित्यात आद्य मालवणी कवी वि. कृ. नेरुरकर, ज्येष्ठ मालवणी कवी ना. शि. परब, वसंत सावंत ते आजच्या पिढीसह एकूण बारा कवींच्या कवितांचा यात समावेश करण्यात आहे. प्रमाण भाषेला बोली भाषा समृद्ध करीत असताना आणि आजच्या बदलत्या काळात या बोली भाषाच नष्ट होत चालल्या असताना मालवणी बोली टिकण्याच्या पार्श्वभूमीवर मालवणी भाषेच्या दृष्टीने ही महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -