Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगर्भधारणा संस्कार

गर्भधारणा संस्कार

‘गर्भधारणा संस्कार’ हे लेखिका शोभा तात्यासाहेब पालवे यांचे गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. या पुस्तकात निरोगी बालकाचा जन्म होण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यावी याविषयी उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले आहे.

प्रियानी पाटील

मातृत्व हे प्रत्येक स्त्रीला एका दिव्यातून नेणारं असतं. पण आपण आई होणार हे जेव्हा स्त्रीला कळतं तेव्हा तो आनंद तिच्यासाठी अविस्मरणीय असाच असतो. या दिवसापासूनचा प्रत्येक क्षण न क्षण तिच्या आणि बाळाच्या काळजीचा असतो. दक्षतेचा असतो. काय खावं, काय खाऊ नये, इथपासून आरोग्याच्या जपणुकीपर्यंतचा प्रत्येक काळ हा तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात नकळत आईच्या मनात एक प्रकारे भीतीही निर्माण होते. प्रसूतीपूर्वी अशी भीती उत्पन्न होणे साहजिक असते.

गरोदरपणातील ही भीती टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे, आहारामध्ये कोणत्या पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे, आहारातील पथ्य पाणी, त्याचप्रमाणे वेळेव गर्भारपण आणि लॅबोरेटरी तपासणी, पुरक औषधांचा वापर आणि महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांपासून कोणतीही गोष्ट न लपवणे आदी गोष्टी तंतोतंत पाळल्या गेल्या, तर माता मानसिक आणि शारीरिकरीत्या बाळाचे पोषण करण्यास सक्षम असते. या काळामध्ये अनेक चांगल्या चांगल्या पुस्तकांचे वाचनही महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मनही सात्त्विक राहते. विशेषत: या काळात देवादिकांची, काही संस्कारमय पुस्तकेही वाचली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यमयी माता तंदुरुस्त राहण्यासाठी काही आरोग्यविषयक पुस्तकेही वाचली तर ती उपयुक्त ठरू शकतात. या काळात डॉक्टरांचे सल्लेही फायद्याचे ठरतात.

‘गर्भधारणा संस्कार’ हे शोभा तात्यासाहेब पालवे यांच्या पुस्तकातही गर्भवती स्त्रियांसाठी विशेष लेख, विशेष टिप्स दिल्या गेल्या आहेत, ज्या गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर आहेत. संस्कारातून मातेचे आिण बाळाचे आरोग्य जपताना कोणती काळजी घ्यावी, गरोदरपणातील त्रासावर कोणते इलाज करावेत, याचे अचूक मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आढळते.

गर्भवती स्त्रीला होणाऱ्या त्रासाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे, मळमळणे, उलट्या होणे, भूक न लागणे, अशक्तपणा येणे, झोप, आळसाचे प्रमाण वाढणे आदी तक्रारी वाढतात. हा त्रास होण्याचं प्रमाण पाहता प्रत्येक स्त्रीचा त्रास हा वेगळा असताे. या काळात पायांना सुज येण्याचे प्रमाण प्रत्येक स्त्रीमध्ये दिसून येत नाही. अॅसिडिटीचे प्रमाण वाढते अशा वेळी आहारात पथ्य पाळणे महत्त्वाचे ठरते. पुस्तकामध्ये ‘अॅसिडिटीवर घाला आळा, थोडी पथ्य पाळा’मध्ये अॅसिडिटीची अनेक कारणे दिली अाहेत, त्याचप्रमाणे घरगुती उपायही दिले आहेत. तसेच कोणते पदार्थ आहारातून टाळले पाहिजेत याचा लेखाजोखाही या पुस्तकात आढळतो.

आपल्या जीवनशैलीत कोणता बदल करावा, आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, गर्भारपणातील पहिले तीन महिने कशी काळजी घ्यावी, चार ते सहा महिन्यांच्या कालावधीतील अवस्था, यामध्ये भुकेचे प्रमाण, उलटी मळमळ थांबून आहारात होणारी वाढ त्याचप्रमाणे बाळाचीही होणारी वाढ, पोटाचा वाढणारा आकार, पोटावरील त्वचा ताणली जाऊन काळसर रेघा दिसणे, पाचव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाळाची हालचाल प्रथम नाजूकपणे व नंतर व्यवस्थितपणे जाणवणे आदी गोष्टींचा उलगडा या पुस्तकातून केलेला आहे. या काळामध्ये काय करावं, तर गर्भाशी संवाद साधावा. गर्भसंस्कार तसेच ध्यानधारणा सुरू ठेवावी. विशिष्ट व्यायाम तसेच योगासने सुरू ठेवावीत. शिवाय दर महिन्याला डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

आपलं बालक निरोगी होण्यासाठी जास्तीत जास्त काळजी कशी घ्यावी याचे पूर्ण आकलन ‘गर्भधारणा संस्कार’ या पुस्तकात करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये गर्भाच्या विकासाचे टप्पे बाळाच्या पहिल्या दिवसापासून नऊ महिने पूर्ण होईपर्यंत त्या गर्भाची झालेली वाढ ते बाळाच्या जन्मापर्यंतचा काळ कसा असतो याचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच गरोदरपणातील त्रास व इलाज, गर्भधारणेनंतर आरोग्य उत्तम राखण्यासाठी घ्यावयाची काळजी, गर्भधारणेनंतर सर्वसाधारण तक्रारी आदी अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

या सर्वामध्ये वाढत्या वयातील गर्भधारणा, निरोगी बालकाचा जन्म होण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यावी याविषयक मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे. दरम्यान मेंदूचे आजार, मानसिक वाढदेखील निरोगी होणे आवश्यक आहे. दरम्यान वारंवार आजारी पडणारी मुले, आळस, अज्ञान, दारिद्र्य, स्वच्छतेचा अभाव यामुळे तसेच इतर काही आजारपणामुळे बाळं मृत्युमुखी देखील पडतात. हे टाळण्यासाठी बाळांची वेळेत योग्य रीतीने काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी बाळ झोपेत असताना अथवा रात्री रडू लागले म्हणून दूध पाजू नये, यांसारख्या अनेक गोष्टीचे पालन करणे आवश्यक ठरते.

बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या लसींचा वापर होणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला योग्यवेळी घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या अनेक बोधक गोष्टी या पुस्तकातून मांडण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -