Sunday, May 19, 2024
Homeमहामुंबईशिष्यवृत्ती परीक्षेत प्रतीक्षा नांगडे जिल्हा गुणवत्ता यादीत चौथी

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रतीक्षा नांगडे जिल्हा गुणवत्ता यादीत चौथी

नमुंमपा शाळांतील १५४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मिळविले स्थान

नवी मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२-२३ यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ५३ प्राथमिक शाळांतील १५४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ३१, कोपरखैरणे या शाळेतील प्रतीक्षा सोमनाथ नांगडे या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चौथे स्थान पटकाविले आहे.
यासोबतच महानगरपालिकेच्या २५ शाळांमधील विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून, घणसोली येथील नमुंमपा शाळा क्र. ४२ येथील ३४ विद्यार्थी, नमुंमपा शाळा क्र. ५५ राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर, रबाळे येथील ३० विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. नमुंमपा शाळा क्र. ३१ सेक्टर ७ कोपरखैरणे येथील १६ विद्यार्थ्यांनी तसेच नमुंमपा शाळा क्र. ३३ पावणे येथील ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. या यशाबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी प्रतीक्षा नांगडे हिचे आणि गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

महानगरपालिका शाळांतील गुणसंपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला आर्थिक बळ मिळावे यादृष्टीने उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रति महिना रु.६००/- इतका आर्थिक लाभ दिला जात आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या या नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील १५४ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनाही महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा लाभ मिळणार आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२२-२३ यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५३ शाळांमधील इयत्ता ८ वीतील ५३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये तब्बल १५४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत मानांकन पटकाविले असून, त्यांना दरमहा रु. १ हजार याप्रमाणे वर्षाला रु.१२ हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम ४ वर्षे मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता १२ वीपर्यंत या विद्यार्थ्यांना दरमहा प्राप्त होणार आहे. आयुक्त नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातून चतुर्थ क्रमांकाने शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी प्रतीक्षा नांगडे व इतर सर्व गुणवत्ता यादीत मानांकन मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या पालकांचेही अभिनंदन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -