Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीजुहू समुद्रकिनाऱ्यावर विषारी ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिशचा वावर

जुहू समुद्रकिनाऱ्यावर विषारी ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिशचा वावर

समुद्रकिनाऱ्यांवर विना चप्पल फिरू नये असे प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात पर्यटक समुद्रकिनारे, धबधबे अशा विविध पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करत आहेत. मात्र मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर मागील काही दिवसांपासून विषारी ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिश आढळू लागल्याने चिंतेत भर पडली आहे. या ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिशच्या वावरामुळे पर्यटकांमध्ये भितीचे सावट पसरले आहे. जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर विना चप्पल फिरू नये असे आवाहन समुद्रकिनाऱ्यांवर तैनात जीवरक्षकांकडून करण्यात येत आहे.

जुहू समुद्रकिनारा कायम पर्यटकांच्या पसंतीचे स्थळ राहिले आहे. पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात. मात्र मधल्या काही वर्षांपासून जेलिफिशचा धोका मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांना भेडसावत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर देखील ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिशचा वावर दिसून आले आहे.

‘टेंटॅकल्स’ पेशींमध्ये विषारी द्रव असलेले ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिशच्या दंश तीव्र वेदनादायक असल्याचे प्राणी अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. सध्या जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने हे जेलिफिश नजरेस पडत असून ‘ब्ल्यू बॉटल’पासून सतर्क राहावे, समुद्रकिनाऱ्यावर अनवाणी फिरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिश विषयी –

मुंबईच्या किनाऱ्यावर साधारण तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. ठराविक मोसमात जेलीफिश किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्यापूर्वी ‘ब्ल्यू बटन’, पावसाळ्यात ‘ब्ल्यू बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेलीफिश किनाऱ्यावर दिसू लागतात अशी माहिती प्राणी अभ्यासकांकडून देण्यात आली आहे. ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिश साधारण हवा भरलेल्या निळ्या पिशवीसारखे दिसतात.

‘पोर्तुगीज मॅन ओ वॉर’ या नावानेही त्यांना ओळखले जाते. पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेला प्रचंड वेगाने वारे वाहत असतात. भरतीच्या वेळी किनाऱ्यावर लाटा धडकत असतात. त्यामुळे वजनाने हलके असलेले जेलीफिश समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतात. त्यापैकीच एक असलेला ‘ब्ल्यू बॉटल’ जेलीफिश विषारी म्हणूनच ओळखला जातो असे सागरी परिसंस्थेचा अभ्यास करणाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -