Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलPoem and riddles : आम्ही दोघे भाऊ

Poem and riddles : आम्ही दोघे भाऊ

कविता : एकनाथ आव्हाड 

आम्ही दोघे जुळे भाऊ
दोघे दोन तऱ्हांचे
आई म्हणते यांचे सांगा
सूर कसे जुळायचे

मी साऱ्यांना लावतो जीव
प्रेमळ म्हणतात मला
भाऊ माझा चिडका बिब्बा
रागीट म्हणतात त्याला

मला म्हणतात वाचाळ सारे
ऐकून माझे बडबडबोल
भाऊ माझा गप्पठप्प
म्हणतात त्याला सारे अबोल

माझं गाणं ऐकून म्हणतात
सुरेल माझे तराणे
भाऊ गायला की म्हणतात
अरेरे, बेसूर झाले गाणे

मी पैसे साठवतो तर
कंजूष ठेवले माझे नाव
खरेदी पाहून भावाची
उधळा म्हणतो त्याला गाव

भीत नाही मी कुणाला
सारेच म्हणतात मला धीट
भाऊ माझा घाबरट ससा
भित्रा म्हणूनच झाला घोषित

जरी आमचे स्वभाव वेगळे
वागणे आमचे भिन्न
मात्र एक झाला दु:खी की
दुसराही होई खिन्न

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड 

१) दादाभाई नवरोजींना
म्हणतात पितामह
नाना पाटील यांना
म्हणतात क्रांतिसिंह

सुभाषचंद्र बोस यांना
नेताजी म्हणूनच ओळखतात
लाला लजपतराय यांना
काय बरं म्हणतात?

२) भू, भमी,
वसुंधरा, धरित्री
क्षमा, रसा, मही,
धरणी आणि धरती

ही आहे जंत्री
एका समानार्थी शब्दाची
सांगा ही एवढी
नावं बरं कोणाची?

३) अनुप्रास, श्लेष, यमक,
व्यतिरेक, अपन्हुती
उपमा, उत्प्रेक्षा, रूपक
आणि चेतनागुणोक्ती

मराठी भाषेचा गोडवा
यांच्यामुळेही जपला जातो
सांगा बरं घटकांना
आपण काय म्हणतो?

उत्तरे : 

१) शेर-ए-पंजाब

२) पृथ्वी 

३) अलंकार 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -