Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीअलिबाग शहरातील पीएनपी नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

अलिबाग शहरातील पीएनपी नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

कोट्यवधींचे नुकसान

अलिबाग (वार्ताहर) : अलिबाग शहराचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख निर्माण झालेल्या पीएनपी नाट्यगृहाला बुधवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण नाट्यगृह आगीत भस्मसात झाले आहे. यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

अलिबाग शहराच्या वेशीवरच असलेल्या या नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते. काम सुरू असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वेल्डिंगची ठिणगी पडली आणि आग लागली. धुराचे आणि ज्वाळांचे लोड गगनाला भिडले. अलिबाग नगरपालिका, आरसीएफ, गेल कंपनी तसेच पेण नगरपालिका आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी फोमचा मारादेखील करण्यात येत होता. तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आसनव्यवस्थेत असलेल्या फोममुळे आग धुमसतच होती.

या आगीत नाट्यगृहाचे पूर्ण नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर थोडयाच वेळात इमारतीचे छत कोसळून पडले, भिंतीदेखील ढासळल्या. तेथील आसन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, सर्व लाकडी फर्निचर, सर्व तांत्रिक व्यवस्था जळून खाक झाले. आगीतील नुकसानीचा नेमका आकडा सांगता येत नसला तरी यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

रसिक हळहळले

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळाने २०१७ मध्ये हे नाट्यगृह उभारले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अलिबागचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख या नाट्यगृहाने निर्माण केली होती; परंतु आगीत नाट्यगृह भस्मसात झाल्याने अलिबागकरांनी हळहळ व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -