Sunday, May 19, 2024
Homeदेशमोदींच्या हस्ते पीएम गती शक्ती योजनेचा शुभारंभ

मोदींच्या हस्ते पीएम गती शक्ती योजनेचा शुभारंभ

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वयासाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातर्फे देशात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू असतात. मात्र अनेकदा या संबंधित खात्यांमध्ये ताळमेळ नसल्याने प्रकल्पांना उशीर होतो, प्रकल्प रखडतात, प्रकल्पांची किंमत वाढते. अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वय राहण्यासाठी संबंधित खात्यांना एकत्र आणणाऱ्या पीएम गती शक्ती या राष्ट्रीय योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजधानीतील प्रगती मैदानावर केला. यावेळी पायाभूत सुविधांशी संबंधित खात्याचे मंत्री नितिन गडकरी, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे असे विविध मंत्री उपस्थित होते.

पीएम गती शक्ती या राष्ट्रीय योजनेच्या शुभारंभानिमित्त उपस्थितांशी संवाद साधताना २०१४ च्या आधी सुरू असलेली कामे आणि २०१४ नंतरची कामे याचा एक लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आणि काँग्रेस आघाडी सरकारचे थेट नाव न घेता सडकून टीका केली. मी २०१४ ला जेव्हा दिल्लीत आलो तेव्हा लक्षात आले की, अनेक प्रकल्प रखडले होते. तेव्हा संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणत निर्णय प्रक्रिया सुलभ केली. यामुळे अनेक प्रकल्प वेगाने पुर्ण झाले. आता पीएम गती शक्ती सुविधा मार्फत सर्व विभाग हे अधिक समन्वय साधत काम करतील. यामुळे या २१ व्या शतकात देशाची प्रगती आणखी वेगाने होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

काही राजकीय पक्ष महत्त्वाच्या प्रकल्पांवर टीका करतात, मात्र जगात हे सिद्ध झालं आहे की पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे झाली तर विकास होतो, रोजगार निर्माण करतात असंही पंतप्रधान म्हणाले.

पीएम गती शक्ती सुविधेमध्ये देशातील राज्य सरकारनेही सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मोदी यांनी केले. या पीएम गती शक्ती सुविधेच्या माध्यमातून पुढील ३-४ वर्षात देशात २०० विमानतळ – हेलिपोर्ट आणि जलवाहतुक मार्ग सुरू करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी जाहीर केले.

पीएम गती शक्ती सुविधेतून १६ विविध विभाग-खाती हे एकाच व्यासपीठावर

पीएम गती शक्ती सुविधेनुसार, तंत्रज्ञानाचा वापर करत १६ विविध विभाग-खाती हे एकाच व्यासपीठावर येतील. कुठल्याही प्रकल्पाच्या कामांची माहिती ही सर्व विभागांना मिळेल. यामुळे पुढील समनव्य साधणे, प्रकल्पातील अडचणी सोडवणे, प्रकल्प वेगाने पुर्ण करणे, प्रकल्पाचा अतिरिक्त खर्च वाचवणे हे शक्य होणार आहे. देशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण होतील, यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होत उद्योगांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

आठ वर्षांत दुप्पट, तिप्पट वेगाने विकास

मागील ७० वर्षांच्या तुलनेत आता वेगाने विकास कामे सुरू आहेत. २०१४ च्या पाच वर्षे आधी काय स्थिती होती? याआधी देशात १९९० किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले होते. मात्र २०१४ नंतर देशात ९००० किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. याआधी देशांत ३००० किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते, मात्र ७ वर्षांत २४ हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. २०१४ च्या आधी देशात फक्त २५० किमी मार्गावर मेट्रो धावत होती. ७०० किमीपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला असून आणखी एक हजार किमी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. २०१४ च्या आधी ५ ठिकाणी जलमार्ग वाहतुक सुरु होती आता ही संख्या १३ वर गेली आहे. बंदरात माल उतरण्याचा कालावधी हा याआधी ४१ तास होता, तो आता २७ तासांवर आला असून यापुढील काळात आणखी कमी होणार आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -